मुरूड ः प्रतिनिधी
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना शनिवारपासून (दि. 25) सुरू होत असून 23 मेपर्यंत उपवास सुरू राहणार आहेत. सध्या मुरूडचे तापमान 36 ते 40 डिग्री सेल्सिअस आहे. अशा वेळी मुरूडमधील वीज वारंवार गायब होत असल्याने लोक त्रस्त असून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे मुरूड वीज मंडळाने येथील वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरू ठेवावा, अशी आग्रही मागणी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी निवेदनाद्वारे वीज मंडळाकडे केली आहे. या वेळी इम्तियाज गोलंदाज, अंकित गुरव, नाझीम किल्लेदार, ताझीम कासकर आदी उपस्थित होते.
वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांच्याकडे आपली बाजू मांडताना जाहिद फकजी यांनी सध्या मुरूड शहरात वारंवार वीज गायब होत असून हे प्रमाण कमी करून लोकांना दिलासा द्यावा, त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वीची कामेसुद्धा त्वरित पूर्ण करून द्यावीत, अशी आग्रही मागणी केली. यावर उत्तर देताना मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर म्हणाले की, रमजानसाठी वीज मंडळ पूर्ण सहकार्य करेल.
या काळात आठवड्याच्या दर मंगळवारी आम्ही दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतो. आता हा शटडाऊन 15 दिवसांनंतर एकदा घेण्यात येईल. वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लॉकडाऊन कालावधीत लोकांना जास्तीत जास्त वीज पुरविली आहे. यापुढेही वीजसेवेत सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही या वेळी उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी आश्वसित केले.