आकर्षक रांगोळीने मंदिर सजले
खोपोली : प्रतिनिधी
अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 19) भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगेने भक्तांचा हा मळा फुलला होता.
अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात काढण्यात आलेली श्री विठ्ठलाची आणि श्रीरामाची सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रवी आचार्य (नेरळ), मंगेश देशमुख (मानकीवली), तुळशीराम ठोंबरे (टेंभरी), सचिन पाटील (कलोते), उत्तम जगदाळे (पनवेल), किशोर हातवे (बदलापूर), अतुल तट्टू (महड), साक्षी देशमुख, स्नेहल देशमुख, श्रेया देशमुख (मानकीवली), स्वरा पाटील, जीवन ठोंबरे, तन्मय पाटील (कलोते) इत्यादी कलाकारांनी ही मनमोहक रांगोळी दहा बाय तीस फूट आकारात आकारली. यात साबुदाणे, काळे तीळ व इतर कडधान्यांचे सुमारे 100 किलो साहित्य वापरले होते. ही रांगोळी काढण्यास सुमारे तीस तास लागल्याचे कलाकारांनी सांगितले.
मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. ट्रस्टतर्फे जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. गणपती संस्थान ट्रस्ट तर्फे अध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व मंदिराबाहेर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. भाविकांना त्रास होणार नाही, यासाठी व्यवस्थापक बडगुजर हे जातीने लक्ष ठेवून होते.