![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/03/Murder2-1024x683.jpg)
पनवेल : बातमीदार
बँकेत गेलेल्या पतीची वाट पहात कारमध्ये बसलेल्या महिलेला अज्ञात मारेकर्याने कारसह पळवून नेऊन आणि नंतर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी भरदुपारी उलवे येथे घडली. प्रभावती भगत (50) असे या महिलेचे नाव असून, त्यांच्याकडील दागिने लुटले गेले नसल्याने या हत्येच्या कारणाविषयी गूढ निर्माण झाले आहे. उरणच्या शेलघर भागात रहाणारे बाळकृष्ण भगत दुपारी पत्नी प्रभावती यांच्यासह कारने उलवे सेक्टर-19 मधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत गेले होते. कार बँकेबाहेर उभी करून आणि प्रभावती यांना कारमध्ये बसवून भगत बँकेत गेले. कारमधील एसी सुरू रहावा यासाठी भगत यांनी कारचे इंजिन सुरूच ठेवले होते. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने कारमध्ये शिरून कार वहाळच्या दिशेने पळवून नेली. प्रभावती यांची त्या व्यक्तीशी झटापट झाल्याने त्याने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरने त्यांच्यावर एक गोळी झाडली. त्यानंतर कार वहाळ गावाजवळील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस सोडून मारेकर्याने पलायन केले. हा प्रकार शेजारील बांधकाम जागेवरील कामगारांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रभावती यांना बेलापूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेतील मारेकर्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मारेकरी सापडल्यानंतरच या हत्येमागचे कारण स्पष्ट होईल, असे परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.