Breaking News

एचआयव्हीची लागण असल्याचे लपवून विवाह; पत्नीलाही बाधा झाल्याने पतीविरोधात गुन्हा दाखल

पनवेल  : बातमीदार

तरुणाने स्वत:ला एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती लपवून ठेवून कामोठे भागात राहणार्‍या 26 वर्षीय तरुणीसोबत विवाह केल्याने वर्षभरातच या तरुणीलादेखील एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कामोठे पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून एचआयव्हीग्रस्त तरुणासह त्याच्या नातेवाइकांवर फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील एचआयव्हीग्रस्त तरुण डोंबिवली पूर्व भागातील कल्याण-शिळफाटा येथे रहाण्यास असून तो मुंबई महापालिकेत कामाला आहे, तर पीडित तरुणी कामोठे भागात रहाते. 2016मध्ये पीडित तरुणीच्या आईवडिलांना ओळखीतील लोकांनी लग्नासाठी तरुणाचे नाव सुचवले होते. त्यानंतर त्या दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर एचआयव्हीग्रस्त तरुणाचे नातेवाईक नेहमी घरी येऊन त्यांच्या मुलाची विचारपूस करून त्याने गोळ्या खाल्ल्या का, याबाबतची चौकशी करायचे. त्यामुळे पतीला कुठला आजार झाला आहे याची विचारणा अनेकदा करूनही पीडितेला कुठल्याही प्रकारची माहिती सासरच्यांकडून दिली जात नव्हती. त्यानंतर पीडित तरुणीचा पती अधूनमधून आजारी पडू लागल्याने शंका आणखी बळावली. त्यावेळेस सासरच्या मंडळींनी मुलाला टीबी झाल्याचे सांगून पीडितेची बोळवण केली, मात्र काही दिवसांनंतर पतीची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर पीडितेला तिच्या पतीला एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले आणि तिला धक्काच बसला. याचा जाब विचारला असता तिला मारहाण करण्यात आली.

काही दिवसांनंतर पीडित तरुणीही आजारी पडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी तिच्या रक्ताच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या, मात्र या तपासणीत तिला काय झाले आहे याची माहिती सासरच्या मंडळींनी तिच्यापासून लपवून ठेवून तिला केवळ ताप आणि अशक्तपणा असल्याचे सांगितले होते, परंतु पीडितेच्या आईवडिलांनी वाशी येथील  रुग्णालयात रक्ताची तपासणी केली असता तिलासुद्धा एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एचआयव्हीग्रस्त पतीसोबतच्या शरीरसंबंधामुळे तिलादेखील एचआयव्हीची लागण झाल्याचे लक्षात आले. फसवणूक केल्याचा जाब विचारण्यासाठी पीडित तरुणी व तिचे नातेवाईक सासरच्या मंडळींकडे गेले असता तिच्या पतीने त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

तसेच पीडितेला घरच्यांनी दिलेले दागिने परत करण्यासही नकार दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईवडिलांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार एचआयव्हीग्रस्त तरुण व त्याच्या नातेवाइकांवर फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply