Tuesday , February 7 2023

निगुर्णाचे भेटी…

संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासूनच वादांचा धुरळा उडत राहतो आणि संमेलन आटोपले तरी तोे खाली बसत नाही हा आजवरचा अनुभव होता. गेल्या वर्षीपासून मात्र साहित्यसंस्कृती मंडळाने अध्यक्ष निवडण्यासाठी राजकारण्यांसारख्या निवडणुका न घेता एकमताने अध्यक्ष निवडण्याचा नवा पायंडा पाडला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचीही निवड यंदा एकमतानेच झाली, ही समाधानाची बाब आहे.

‘सह नेते ते साहित्य’ अशी साहित्याची व्याख्या साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितली. ती व्याख्या केवळ साहित्यप्रेमीच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवावी अशी आहे. 93व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा शुभारंभ शुक्रवारी उस्मानाबाद येथे झाला. तीन दिवसांसाठी येथे लेखक, कवी, विचारवंत आणि साहित्यप्रेमींची झुंबड उडेल. त्यासाठी खास उभारण्यात आलेल्या संत गोरोबा कुंभार नगरीत साहित्यिक आणि कलावंतांची मांदियाळी एकवटणार असून रसिकांसाठी ती निश्चितच मोठी मेजवानी असेल. उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हा असला तरी साहित्य संमेलनाच्या पाणपोईवर तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणचे साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. संमेलनाचे उद्घाटक म्हणून कवीश्रेष्ठ ना. धों. महानोर यांचा सहभाग लाभलेले हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल यात शंका नाही. मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी मानली जाते. एकनाथ, नामदेव, गोरोबा कुंभार अशा कितीतरी संतांची नामावळी सांगता येईल. इतकी संतरत्ने या भूमीने जगाला दिलेली आहेत. पर्यायाने, याच भूमीत संतसाहित्याचा उदय झाला असे म्हटले तरी वावगे होणार नाही. ‘तुझे रूप चित्ती राहो। मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास। सुखे करी काम॥’ असे म्हणणार्‍या संत गोरोबा कुंभार यांच्या नगरीतच साहित्यविषयक चिंतन, वादसंवाद, विचारांचे आदानप्रदान होणार आहे, होते आहे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलने म्हटली की नसते वितंडवाद पाठोपाठ येतात हेही तितकेच खरे आहे. यातील बव्हंशी वितंडवाद साहित्यबाह्य कारणांमुळे गाजतात हा त्यातील दुर्दैवी भाग. उस्मानाबादकरांनी हे संमेलन कमीत कमी खर्चात करण्यासाठी अपूर्व मेहनत घेतली असून अन्य इच्छुक आयोजकांनी त्यांचे अनुकरण भविष्यात करावयास हरकत नाही. भव्य-दिव्यतेपेक्षा अर्थपूर्ण आयोजन साहित्यव्यवहाराला पोषक ठरेल यात शंका नाही. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणात नेमक्या याच भावनेला प्रतिसाद मिळालेला दिसतो. फादर दिब्रिटो यांनी आपल्या भाषणात संतांच्या महतीपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांचे भाषण मुळातूनच वाचण्याजोगे आहे व त्यात उल्लेखलेल्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे विचारचिंतन होत राहिले तर साहित्य संमेलने हवीतच कशाला असा प्रश्न विचारणार्‍यांना चोख उत्तर मिळेल. उस्मानाबादेतील साहित्य संमेलन मराठी भाषेला आणखी पुढे घेऊन जाणारे ठरेल अशी अपेक्षा आपण सारे बाळगुया. कारण अभिजात दर्जाची मागणी घेऊन सरकारदरबारी खेटे घालणार्‍या मराठी भाषेला अशा अर्थपूर्ण संमेलनांमुळेच खर्‍या अर्थाने अभिजाताचा स्पर्श होईल. संत गोरोबांची मराठी कालही अभिजात होती, आहे व राहील. ‘निर्गुणाचे भेटी। आलो सगुणासंगे। तव झालो प्रसंगी। गुणातीत॥’ असे म्हणणार्‍या संत गोरोबांच्या मराठी भाषेचा हा उत्सव सुफळ संपूर्ण व्हावा.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply