Monday , January 30 2023
Breaking News

प्रवाशांनी दिला तरुणांना चोप; ट्रॅव्हल्स बस चालकासोबत किरकोळ वाद

पनवेल : बातमीदार

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून खासगी ट्रॅव्हल बसच्या चालकाला मारण्यासाठी बसमध्ये घुसलेल्या तीन कॉलेज तरुणांना बसमधील प्रवाशांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी (दि. 7) रात्री कामोठे येथे घडली. कळंबोली पोलिसांनी तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मारुती मोरे हा बसचालक मुंबईतील वैभव ट्रॅव्हल्समध्ये चालक म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री आठ वाजता मारुती मुंबई येथून कोल्हापूर येथे ट्रॅव्हल्स बस घेऊन निघाला होता. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही बस सायन-पनवेल मार्गावरील कामोठे येथील पुलावर आली असताना, बसच्या उजव्या बाजूने पल्सर मोटरसायकलवरून जाणार्‍या तिघा तरुणांनी ट्रॅव्हल बसला कट मारली. त्यामुळे मारुती मोरे याने मोटरसायकलस्वाराला गाडी नीट चालव, असे सुनावले. या गोष्टीचा मोटारसायकलवरील तरुणांना राग आल्याने त्यांनी आपली मोटारसायकल ट्रव्हल बससमोर उभी केली. त्यानंतर तिघा तरुणांनी मारुतीला शिवीगाळ करत बसच्या दरवाजावर दगड मारला. त्यामुळे दरवाजाची काच फुटून ट्रॅव्हलचा मॅनेजर अनिकेत दळवी याच्या डोक्याला मार बसला. त्यानंतर तिघा तरुणांनी बसमध्ये घुसून मारुती याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी तिघा तरुणांना पकडून चोप दिला. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तिघा तरुणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply