Tuesday , February 7 2023

टाटा स्टीलने केली 25 हजार झाडांची लागवड; वेगवेगळ्या 29 प्रकारची रोपे

खालापूर : प्रतिनिधी

टाटा स्टील बीएसएल (आधीची भूषण स्टील) कंपनीने  खालापूर तालुक्यातील सावरोली येथील आपल्या कारखान्याच्या परिसरात मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्प सुरू केला असून, या प्रकल्पामध्ये एन्व्हायरो क्रिएटर फाऊंडेशनच्या तांत्रिक सहयोगाने दोन एकर जमिनीवर तब्बल 25 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये 29 वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. टाटा स्टील बीएसएलच्या सावरोली येथील कारखाना परिसरातील मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्पात जांभूळ, सीताफळ, नीम, करणी, आसोपालव, काजू, मोहडा, बंगाली, बावर, सारू, अर्जुन, बांबू, रिठा, पुत्रंजीव, बेहडा, शेवगा, बेल, गरमाला, रक्तचंदन, बदाम, फणस, पेरू, सीताअशोक, काजोलीया, सेवन, सांडी, गुलमोहर आणि आवळा अशा विविध प्रकारच्या स्थानिक झाडांची लागवड या वनामध्ये करण्यात आली आहे. टाटा स्टील बीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंघल यांच्या हस्ते या वृक्ष लागवड प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी टाटा स्टील बीएसएलचे चीफ फायनान्स ऑफिसर संजीब नंदा, कार्यकारी प्लान्ट प्रमुख (खोपोली व होसूर) कपिल मोदी, उपाध्यक्ष व्ही. बिंदू, अभिषेक सिन्हा, एन्व्हायरो क्रिएटर फाऊंडेशनचे सहसंस्थापक डॉ. राधाकृष्ण नायर यांच्यासह कंपनीच्या पर्यावरण टीमचे सदस्य उपस्थित होते.

मियावाकी वृक्ष लागवड पद्धती

जपानी शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी वनीकरणाचे नवीन आणि अतिशय लोकप्रिय तंत्र शोधून काढले आहे. त्याचा वापर करून अगदी कमी कालावधीत दाट झाडे वाढविली जाऊ शकतात. वृक्ष लागवडीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा मियावाकी जंगल 10 पट जास्त वेगाने वाढते. यातील जैवविविधता 100 पट जास्त असते आणि यामुळे 30 पट जास्त हिरवाई निर्माण करता येते.  मियावाकी पद्धतीने पारंपरिक वृक्ष लागवडीपेक्षा 30 पट किंवा त्यापेक्षा जास्त कार्बनडाय ऑक्साइड वायू वातावरणातून शोषला जातो. याची संपूर्ण प्रक्रिया 100 टक्के सेंद्रिय असून, स्वयंपूर्ण आहे आणि दोन वर्षांनंतर त्याला जराही देखभालीची आवश्यकता भासत नाही.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply