मुरूडमध्ये महाआघाडीत पेच
मुरूड : प्रतिनिधी
नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवकपद काँग्रेस पक्षाला मिळाले पाहिजे, अशी मागणी त्या पक्षाचे मुरूड शहर अध्यक्ष श्रीकांत गुरव यांनी केली आहे. त्यामुळे मुरूडमध्ये महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकाप या तीन पक्षांनी आघाडी करून मुरूड नगर परिषदेची 2016ची सार्वत्रिक निवडणूक लढविली होती. त्या वेळी झालेल्या समझोत्यानुसार स्वीकृत नगरसेवकपदाची प्रथम संधी शेकापला देण्यात आली. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास संधी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे मुरूड शहर काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत गुरव यांनी पत्रकारांना सांगितले. मुरूड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागा लढविल्या होत्या. त्यात त्यांना तीन जागांवर विजय मिळाला, तर शेकापचे पाचपैकी दोनच उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेसने तीन जागा लढवल्या, त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले. काँग्रेसने कमी जागा लढवूनही जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या वेळी स्वीकृत नगरसेवक काँग्रेसचाच झाला पाहिजे, असा दावा गुरव यांनी केला. आता महाआघाडीत नक्की काय निर्णय होतो, याकडे मुरूडकरांचे लक्ष लागले आहे.