पालीत प्रचार रॅली व सभा
पाली ः प्रतिनिधी
आपल्या भारत देशाला सशक्त बनवायचे असेल तर सशक्त भाजप बनवावा लागेल. या दृष्टीने परिसराचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत ते संसद सर्वत्र भाजप सत्तास्थानी येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 18) येथे केले. महाकाली मंदिरात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पाली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. 13 प्रभागांत भाजपचे शिलेदार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन रॅली काढण्यात आली. या रॅलीला प्रतिसाद लाभला. यानंतर झालेल्या सभेत आमदार चव्हाण यांनी आपल्या विस्तृत भाषणात महाविकास आघाडीवर टीका केली.
पाली शहराला शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी 13 कोटींची योजना मंजूर झाली होती, मात्र ही योजना महाविकास आघाडीच्या नतभ्रष्ट सरकारने होऊ दिली नाही, असा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. या अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, पर्यटनवृद्धी, स्वछता, शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते यासाठी भाजपच्या हाती सत्ता द्या. संकल्पनाम्यातील प्रत्येक विकासकाम कृतीत आणू, अशी ग्वाही आमदार चव्हाण यांनी या वेळी दिली.
भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी पालीच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी भाजपच्या हाती सत्ता द्या, पाली शहराचा कायापालट करून दाखवू, असे आश्वासित केले.
संघटन सरचिटणीस सतीश धारप म्हणाले की, महाविकास आघाडीचे विश्वासघाती सरकार सत्तेत आले आणि पेयजल योजना धुळीस मिळाली. पाली शहराला शुद्ध पाणीपुरवठ्याची योजना भाजपच्या माध्यमातूनच मार्गी लागणार आहे.
जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी पाली नगरपंचायतीत भाजपचे कमळ फुलणार व पालीचा चेहरामोहरा भाजपच्या माध्यमातूनच बदलणार, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, भाजप सुधागड तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, आलाप मेहता, भाजप सुधागड तालुका सरचिटणीस सागर मोरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रोहन दगडे, केतन देसाई, उमेश मढवी, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, अजय खंडागळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.