पोलादपूर तालुक्यामधील महिनाभरातील दुसरी घटना
पोलादपूर : प्रतिनिधी
कशेडी घाटातील भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्टेवाडी येथील दरीच्या बाजूला एका अज्ञात टँकरमधील केमिकल ओतल्याची घटना बुधवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळ दरीच्या बाजूला एका अज्ञात केमिकल टँकरमधील केमिकल ओतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. सदरचे केमिकल वाहत जाऊन एका विहिरीपर्यंत पोहचल्याची माहिती भोगाव खुर्दचे सरपंच राकेश उतेकर यांनी दिली. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांच्यासह पोलादपूर पंचायत समितीचे अधिकारी तसेच पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत पंचनामा केला आणि रसायनाचे नमुने तसेच विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन पृथःकरणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. यापूर्वी 28 डिसेंबर 2019 रोजी पोलादपूर तालुक्यातील पार्ले आणि पार्लेवाडी गावानजीक केमिकल वाहून नेणार्या टँकरने द्रवरूप केमिकल जमिनीवरच ओतून टँकर रिकामा केला. त्यानंतर ते केमिकल सावित्री नदीपात्रात वाहत जाऊन अनेक मासे मृत झाले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा तसाच प्रकार घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.