Breaking News

आधी जय श्रीराम, आता जय साईराम!

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू गजानन महाराज की जय॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू सच्चिदानंद श्री अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥ श्री साईनाथ, श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे तीन समकालीन संत प्रभू भगवान श्री दत्तात्रेय यांचे अवतार मानण्यात येतात.

भारतावर दीडशे वर्षे राज्य करणार्‍या ब्रिटीशांच्या विरोधात जो प्रखर स्वातंत्र्य लढा उभारण्यात आला होता, त्या लढ्यातील अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या एका व्यासपीठावर शेगावनिवासी श्री गजानन महाराज उपस्थित होते आणि त्यांनी लोकमान्य टिळकांच्या अटकेचे संकेत देत आपल्या हातून तुरुंगात मोठे कार्य घडणार आहे, अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी ’गीतारहस्य’ या ग्रंथाची रचना केली. श्री गजानन महाराजांच्या संदर्भातील पुस्तकात हा संदर्भ मिळतो.

अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ यांच्या जीवनावर चित्रपट आणि मालिकासुद्धा निघाल्या आहेत आणि कसलेले ख्यातनाम अभिनेते मोहन जोशी, तसेच प्रफुल्ल सामंत यांनीही स्वामींच्या भूमिका करून साक्षात महाराजांचे दर्शन भक्तांना घडविले आहे. श्री साईबाबा यांच्या जीवनावर आधारित गाजलेला चित्रपट प्रख्यात आभिनेते भारतकुमार उर्फ मनोजकुमार यांनी ’शिर्डी के साईबाबा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित केला आणि त्या माध्यमातून अभिनेते सुधीर दळवी हे केवळ मुंबई, महाराष्ट्र नव्हे; तर लंडन, अमेरिका येथेही घराघरात साईबाबा म्हणून पोहोचले. आतासुद्धा छोट्या पडद्यावर साईबाबांची मालिका गाजत आहे. या संतांपैकी कोणीही आपण ईश्वर आहोत, भगवंत आहोत, असा दावा केलेला नाही. परमेश्वराची आराधना करण्यासाठी भक्तीमार्गाने मनःशांती प्राप्त होण्यासाठी या प्रत्येक संतांनी उपदेश केला आहे.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार, रोहिदास, जनाबाई, सावता माळी, अक्कोळचे बाळूमामा यांच्यापासून ते जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून ’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा गुरुमंत्र-कानमंत्र देणारे वामनराव पै, गगनगिरी महाराज, पांडुरंगशास्त्री आठवले, गोंदवलेकर महाराज, तुकडोजी महाराज, धुळ्याचे बापूजी भंडारी, अंबरनाथचे प्रसाद महाराज, बदलापूरचे रत्नाकर महाराज, अनिरुद्ध बापू, स्वामीनारायण, डोंगरे महाराज, जलारामबापा अशा असंख्य संत-महंतांनी लोकांना भक्तीमार्गाने, नामजपाने आपल्या आयुष्यात मनःशांती मिळावी म्हणून संदेश-उपदेश दिलेले आहेत.

आजकाल माणसाला आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडीशी मनःशांती हवी असते आणि मग तो त्याच्या आवडीच्या श्रद्धास्थानाची निवड करतो. म्हणूनच पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी आषाढी कार्तिकीला तन-मन-धन अर्पण करून जात असतात. या पंढरीच्या वारीची भुरळ देश विदेशात तमाम भक्तांना, पर्यटकांना पडते. मग त्याचे हवाई चित्रिकरण करण्याचा आणि त्याची छायाचित्रे काढण्याचा मोह भल्या-भल्यांना झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक व्यक्तीचे श्रद्धास्थान असते आणि त्या श्रद्धास्थानाभोवती त्याच्या भावना जोडलेल्या असतात. भावना, अस्मिता, श्रद्धा, सबुरी या सर्व गोष्टी भक्तांशी निगडीत आहेत. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आता नवीन वाद सुरू झालाय. साईबाबा यांचा जन्म कुठे झाला? शिर्डीला की पाथरीला? शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील, तर पाथरी हे परभणी जिल्ह्यातील ठिकाण. हजारो वर्षांपासून सुरू असलेला प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी सोडविला. त्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. काही महिन्यांतच हे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहील आणि रामलल्ला आपल्या स्थानी विराजमान होतील. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमिचा वाद संपतो न संपतो तोच आता श्रीसाईबाबा यांच्या जन्मस्थान-जन्मस्थळ याचा वाद सुरू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरीचे नेते बाबाजानी दुर्राणी, संजय जाधव आणि पाथरीच्या ग्रामस्थांनी पाथरीला साईबाबा यांच्या जन्मभूमीचा दर्जा देऊन या भागाचा विकास करण्यासाठी आग्रह धरला आहे. शिर्डी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शिर्डीच्या साईबाबा संस्थानसोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली भूमिका मांडली. पाथरीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले, परंतु त्यांची भेट झाली नाही म्हणून पाथरीच्या ग्रामस्थांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थानानंतर आता साईबाबा यांच्या जन्मभूमीचा वाद न्यायालयात पोहोचला. भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पाथरीचे नामांतर करण्यात यावे आणि साईधाम म्हणून पाथरीला ओळखण्यात यावे, त्याचप्रमाणे पाथरीजवळच्या सेलू हेसुद्धा साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले असल्याने पाथरी-सेलू-शिर्डी असा साईबाबा कॉरिडॉर बनविण्यासाठी आग्रह धरला आहे. तिसरीकडे बीड जिल्ह्यातील साईभक्तही अहमहमिकेने पुढे आले असून, पाथरीहून साईबाबा हे शिर्डी येथे औरंगाबाद मार्गाने जात असताना बीड येथे वास्तव्यास होते. इतकेच काय तर साईबाबा यांनी बीड येथे नोकरीसुद्धा केली असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शिर्डी आणि पाथरी ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत पाथरी तीर्थक्षेत्र हा उल्लेख मागे घेऊन तेथील विकासासाठी निधी देणार असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद अद्याप क्षमलेला नाही. आता हा वाद कुठपर्यंत जाईल हे दस्तुरखुद्द साईबाबा हेच जाणू शकतील.

साईभक्तांनीही जर साईबाबा यांनी सांगितलेल्या श्रद्धा आणि सबुरी या मंत्राचा-संदेशाचा मान ठेवून त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न तर खर्‍या अर्थाने ’सबका मालिक एक’ची अनुभूति त्यांना होऊ शकेल. साईचरित्र वाचणार्‍या प्रत्येक साईभक्ताने साकल्याने विचार केला तर प्रश्न सुटायला अडचणी येणार नाहीत. आज भारतातील प्रत्येक तीर्थक्षेत्रे पाहिली तर तिथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मग तिरुपती बालाजी असो, दक्षिणेकडे असलेली देवस्थाने असोत की मग साईबाबा यांची शिर्डी. काही वर्षांपूर्वी तर शिर्डीच्या साईबाबा देवस्थान ट्रस्टतर्फे राज्य सरकारच्या खडखडाट असलेल्या तिजोरीत भर घातली गेली. शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या देवस्थानच्या शिस्तीचे, तेथील उत्कृष्ट व्यवस्थापन बाबतीत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग पुंडलिक ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांनी आपल्या विधान परिषदेत केलेल्या भाषणात खास गौरवपूर्ण उद्गार काढले आणि देशातील सर्वच देवस्थानांनी शेगावचा आदर्श घेतला पाहिजे, अशी सूचना केली होती. शिर्डी साईबाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी काही महिन्यांपूर्वी शेगाव येथे जाऊन श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांची भेट घेतली होती आणि तेथील व्यवस्थापन कौशल्य समजून घेतले होते. शिवशंकर भाऊ हे स्वतःच्या घरून पिण्याच्या पाण्याची बाटलीसुद्धा घेऊन येतात. देवस्थान ट्रस्टचा एक नवा पैसासुद्धा ते घेत नाहीत. एक प्रख्यात उद्योगपती शेगाव येथील एका प्रकल्पासाठी सुमारे साडेसातशे ते आठशे कोटी रुपये देऊ करीत होते, पण शिवशंकर भाऊ पाटील यांनी, ’माऊली, माझ्या गजानन बाबांच्या समोर असलेल्या पेटीत भक्त जे काही 10-15 रुपये दान करतात त्यातून मी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन’ असे विनम्रपणे सांगितले आणि कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाच्या धर्तीवर भव्य प्रकल्प शेगावीच्या राणासमोर उभा राहिला. मुळात साईबाबा एकदमच प्रगट झाले अशी कहाणी आहे, मग जन्म कुठे झाला? शिर्डीला की पाथरीला? कुणाच्या घरात जन्म झाला? या बाबींवरच आपण वाद घालणार की बाबांनी सांगितलेल्या भक्तीमार्गाने वाटचाल करीत आपले क्षणभंगुर आयुष्य मार्गी लावणार, हा प्रत्येक व्यक्तीने विचार करण्याचा विषय आहे.

शिर्डी येथे पायी जाणारे जसे साईभक्त आहेत, तसेच दादरच्या श्री सिद्धिविनायक गणेशाची आराधना करण्यासाठी प्रत्येक चतुर्थीला, अंगारकीला, मंगळवारी पहाटे चालत जाणारे भक्त काही कमी नाहीत. दिंड्या-पताका घेऊन तल्लीन होत प्रत्येक भाविक भक्त आपापल्या श्रद्धास्थानाकडे मार्गक्रमण करीत असतो. प्रत्येक भक्तांना सहज दर्शन उपलब्ध कसे होईल, मांढरदेवीसारखी घटना घडणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही. त्याच्या जीवनात तो सुखी कसा राहील, हे पाहणे आवश्यक आहे. आज रस्तोरस्ती, गल्लोगल्ली साईबाबांच्या छोट्या छोट्या मूर्ती आढळतात. त्यात श्रद्धेने येणार्‍या भक्तांना मिळणारे दर्शन किती? आणि त्या मार्गाने आपला चरितार्थ चालविणारे किती? प्रत्येक देवळाच्या बाहेर असलेल्या भीक्षेकर्‍यांच्या रांगा, धडधाकट मुले, महिला या रांगेत दिसून येतात. या सर्वांसाठी कोणती उपाययोजना करणार? श्रद्धेपायी भीक घालून अशा धडधाकट लोकांना लाचार बनविणार? हा विषय वाटतो तितका सोपा मुळीच नाही. त्यामुळे वाद वाढणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जगाच्या पाठीवर असा एकही प्रश्न नाही की तो चर्चेने सुटणार नाही. सबका मालिक एक या धारणेतून श्रद्धा आणि सबुरी ठेवत मार्ग काढू या. ॥जय साईराम॥

-योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply