Breaking News

हिंदवी स्वराज्याचा ‘सिंह’ नरवीर तानाजी मालुसरे

सतराव्या शतकातील तो काळ… त्या वेळी दख्खनमध्ये विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, गोवळकोंड्याचा कुतूबशहा, तर उत्तरेत मुघल बादशहा औरंगजेब राज्य करीत असे. महाराष्ट्रासह भारतासाठी हा शब्दश: ‘काळ’ ठरत होता; कारण नैसर्गिक साधनसंपत्ती, विपूल सुबत्ता असूनही केवळ मुजोर पातशाहांच्या उपद्रवामुळे लोकांना जगणे मुश्कील झाले होते. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. त्यानंतर सुरू झाला तो स्वराज्यासाठीचा संघर्ष. तेव्हाच्या या स्थितीची एक झलक ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या सुरुवातीलाच पहावयास मिळते.

कोणत्याही चित्रपटात पात्रांशी अनुरूप ठरतील अशा अभिनेता-अभिनेत्रींची निवड करणे महत्त्वाचे असते. या चित्रपटात ती नेटकेपणे केलेली आहे. तानाजींच्या भूमिकेत भारदस्त अजय देवगण उठून दिसतो. त्याच्या पराक्रमाला चातुर्याची चपखल जोड देण्यात आली आहे, परंतु वेशभूषेत त्याच्या मिशा तानाजींप्रमाणे झुपकेदार आणि डोक्यावर फेट्याऐवजी आडवी पगडी दाखविली असती, तर अधिक जिवंतपणा आला असता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप सोडल्यास सगळे मराठा सेनापती, सरदार, मावळे पगडी वापरत असत. सैफ अली खानने क्रूर, पण तितकाच युद्धकुशल व शिस्तप्रिय उदयभान सिंग राठोड ताकदीने रंगवलेला आहे. इथेही तो राजपूत असून, त्याला मुस्लिम लूक दिलेला दिसतो. मराठी सिनेमांमध्ये सर्रास सहाय्यक अभिनेता म्हणून काम करणार्‍या शरद केळकर याला या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारण्याचा बहुमान मिळाला आहे. नेहमीप्रमाणे या गुणी कलाकाराने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. काजोल (तानाजींची पत्नी), अजिंक्य देव (चंद्राजी पिसाळ), देवदत्त नागे (तानाजींचा भाऊ सुर्याजी मालुसरे) यांच्या वाट्याला छोटेखानी भूमिका आल्या आहेत. त्या तुलनेत कैलास वाघमारे (चुलत्या) जास्त भाव खाऊन गेलाय.

वीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटात खुबीने करण्यात आला आहे. अत्याधुनिक थ्रीडी ग्राफिक्समुळे लढाया रोमांचक वाटतात. अगदी एखादे शस्त्र आपल्या अंगावर येतंय असा भास होतो. चित्रपटाचे संगीत परिस्थितीला साजेसे आहे. त्याचे श्रेय अजय-अतुल, संचेत परंपरा आणि संदीप शिरोडकर यांना जाते.

भारतीय सिनेसृष्टीला बायोपिकचा चढलेला ज्वर अद्याप कायम आहे. एखाद्या व्यक्तिच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आयतीच मिळत असल्याने आणि तिचे संदर्भ सहजगत्या उपलब्ध होत असल्याने दिग्दर्शकाचे काम अर्धे सोपे झालेले असते, पण संबंधित व्यक्तिला चित्रपटात मुख्य नायक अथवा नायिका म्हणून दाखविताना त्याच्या मूळ छबीला धक्का न लावता सोबतच तत्कालीन संदर्भांशी छेडछाड न करणे हे खरे कसब असते. इथे मात्र ओम राऊत यांनी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली इतिहासच बदलला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक गोष्टी बेमालूम घुसडण्यात आल्या आहेत.

उदयभान हा कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता, पण त्याने आपल्यासोबत महाकाय नागीण तोफ आणल्याचा दाखला इतिहासात नाही. शिवाय तो बुर्‍हाणपूरहून आला होता. तेथून कोंढाण्याकडे तोफ घेऊन येण्यासाठी जलमार्ग नाहीए. त्याच्या मार्ग बदलण्यामागे शिवशाहीतील फंदफितुरी दाखविण्यात आली आहे, मात्र मुळात गद्दारी करणारे चंद्राजी पिसाळ हे अस्तित्वात नव्हते. होते ते सुर्याजी पिसाळ. रायगडचे किल्लेदार असताना ते फितूर झाले व त्यांनी मोगलांना चोरमार्ग दाखवून रायगडावर येण्यास व महाराणी येसूबाईंना कैद करण्यास मदत केली. त्यांचा तानाजींच्या मोहिमेशी काही संबंध आलेला नव्हता. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे मुख्य लढाईआधी मला शत्रूला बघायचे आहे असे म्हणत तानाजी कोंढाण्यावर जातात आणि तेथे उदयभान त्यांना पकडून साखळदंडाने बांधतो. मग उदयभानचे एकतर्फी प्रेम असलेल्या अपहृत कमल (नेहा शर्मा) हिचा भाऊ जगत सिंग (विपूल गुप्ता) तानाजींना मदत करतो आणि तानाजी गडावरील झाडांमधून जाणार्‍या गुप्तमार्गाने निसटून जाण्यात यशस्वी होतात असे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात असे काही घडलेलेच नव्हते. 

चित्रपटाच्या शेवटी घनघोर लढाई होते. त्या वेळी मराठा सैन्य सरस ठरत असल्याचे पाहून भेदरलेला उदयभान नागीण तोफ छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेल्या राजगडाकडे उभी करून तीत दारूगोळा भरतो. ते पाहून तानाजी आपल्या घोड्यासह पुढे सरसावतात आणि तोफेची वात विझविण्यासाठी हात पुढे करतात तोच उदयभानही उडी मारून तलवारीचा प्रहार तानाजींच्या हातावर करतो. त्यानंतर दोघांमध्ये तुंबळ युद्ध होते. तुटलेल्या हाताला शेला गुंडाळून तानाजी नेटाने लढतात. सरतेशेवटी ते उदयभानाला प्रचंड तोफेसह गडावरून खाली ढकलून देतात. दरम्यान, शिवरायांना रहावले जात नसल्याने ते कोंढाण्यावर दाखल होतात. त्यांच्यासमक्ष तानाजी आपला प्राण सोडतो, असा क्लायमॅक्स दाखविला गेला आहे. इतिहास मात्र वेगळेच सांगतो.

4 फेब्रुवारी 1670 रोजी अष्टमीच्या रात्री जेव्हा कोंढाणा किल्ल्यावर युद्ध झाले तेव्हा उदयभानाशी लढताना तानाजींना वीरमरण आले. सरदार कामी आल्याने मराठा सैन्य गडबडले. तेव्हा तानाजींचा भाऊ सुर्याजी यांनी दु:ख बाजूला सारून ठणकावले, ‘अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही भागूबाईसारखे काय पळताय? मी गडाचे दोर कापले आहेत. तुम्ही गडावरून उड्या मारून जीव द्या; नाही तर शत्रूवर तुटून पडा. मग सारे सैन्य मागे फिरले आणि त्यांनी त्वेषाने लढा दिला. अखेर उदयभानाचा खात्मा करून गडावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. अशा प्रकारे हा किल्ला पुन्हा स्वराज्यात समाविष्ट झाला. दुसर्‍या दिवशी ही हकीगत शिवरायांना समजली तेव्हा ते म्हणाले होते, ‘गड आला, पण सिंह गेला.‘ त्यानंतर या किल्ल्याचे सिंहगड असे नामकरणही करण्यात आले.

उदयभानाशी दोन हात करताना तानाजी धारातीर्थी पडले, पण तत्पूर्वी त्यांनी आपला एक हात तुटलेला असतानाही त्याला शेला गुंडाळून शेवटच्या श्वासापर्यंत निकराची झुंज दिली. ते काही पळून गेले नाहीत. या शिलेदाराने यापूर्वीही अनेक लढायांमध्ये आपला पराक्रम गाजवला होता. त्यामुळे कोंढाण्याच्या मोहिमेत ते अखेरपर्यंत लढल्याचे चित्रपटात दाखविणे जरूरी नव्हते. उलट तानाजींसह त्यांचा भाऊ व मामा यांचेही योगदान पडद्यावर ठळकपणे दिसले असते, तर स्वराज्यासाठी त्यांचे अख्खे कुटुंब कसे झपाटलेले होते, हे नव्या पिढीसमोर आले असते.

तानाजी व त्यांचे सहकारी घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा किल्ला सर करून गेले असे सांगितले जाते. यात किती तथ्य आहे ते माहीत नाही, पण चित्रपटात घोरपडीऐवजी घोरपडे बंधू प्रारंभी किल्ला चढताना दाखविणे संयुक्तिक वाटते. चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकांची पकड घेण्यास सुरुवात करतो. कुठेही चित्रपटाची गती कमी झालेली नाही. उत्तरोत्तर तो रंगत गेला आहे. छायाचित्रणही उत्तम झाले आहे. असंबंध इतिहास वगळता ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे’ अशी स्वराज्याशी असीम निष्ठा राखणारा हिंदवी स्वराज्याचा ‘सिंह’ तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा थरारकच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांना मानाचा त्रिवार मुजरा!

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply