शिक्षक, शाळा, विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा
अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 20) राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची भेट घेतली. या वेळी राज्यातील शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांना भेडसावणार्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावर झालेल्या चर्चेअंती या प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन राजेश कुमार यांनी दिले.
संगणक अर्हता प्रमाणपत्र विहीत मुदतीत सादर न केल्यामुळेसेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शिक्षकांची उपदानातून मिळणारी संपूर्ण रक्कम मिळत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली व सदर वसुली न करता संपूर्ण रक्कम संबंधित शिक्षकांना तात्काळ आदा करण्यात यावी, अशी मागणी या वेळेस शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली.
बंद असलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सर्व तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ सुरू करावी व सर्व जिल्हा परिषदमधील बदली प्राप्त शिक्षकांना बदली झाल्यानंतर कुठलीही अट न ठेवता तात्काळ ज्या त्या जिल्ह्यात हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात यावे. जे पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्हा परिषदेत काम करीत आहेत, त्यांच्या विनाअट तात्काळ एकत्रीकरण बदल्या करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अर्हता दिनांक 31 मे 2022 ऐवजी 30 जून ही ग्राह्य धरावी, 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवत असताना बदलीपात्र शिक्षकांना काही ठिकाणी 31 मे 2019 मध्ये कार्यमुक्त न करता जून 2019 मध्ये कार्यमुक्त केल्याने अतिदुर्गम क्षेत्रात ज्या महिला शिक्षकांची बदली झाली आहे, त्यांना 31 मे 2022 मध्ये तीन वर्षे पूर्ण होत नाहीत, हा त्यांच्यावर होणारा अन्याय असल्याची बाब या भेटीत निदर्शनास आणून दिली.
केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ही पदे 40 : 30 : 30 याप्रमाणे भरण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करून नव्याने आदेश करण्याची विनंती करण्यात आली. शाळांची विद्युत देयके जिल्हा परिषद अंतर्गत भरण्यात यावीत. अथवा शाळांची विद्युत देयके भरण्यासाठी शासनाने विशेष अनुदान वितरित करणे, अथवा जिल्हा परिषद स्तरावर विद्युत देयके भरण्याची व्यवस्था करावी. राज्यातील किमान 95 क्क्यांपेक्षा अधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत, आणि शाळांची विद्युत देयके न भरल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, परिणामी पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होत आहे. ही बाब लक्षात घेवून विद्युत देयके भरण्यासाठी निधी उपलब्ध केला जावा, अशी विनंती या वेळी करण्यात आली.
शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहोकले, राज्य कार्याध्यक्ष भरत मडके, राज्य कार्यालयीन मंत्री भगवान घरत, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णकांत मलिक, ठाणे जिल्हा कार्यवाहक गणेश पोद्दार, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अशोक अहिर यांचा समावेश होता.