Breaking News

एक्सर्बिया आणि शेतकरी वाद पुन्हा ऐरणीवर

भाडेकराराचे पैसे दिले नाहीत म्हणून शेतकर्‍यांनी केला कंपनीचा रस्ता बंद

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील वरई तर्फे वरेडी येथे गृहप्रकल्प असलेल्या एक्सर्बिया कंपनीचा रस्ता शेतकर्‍यांनी बंद केला आहे. कंपनीचा रस्ता स्थानिक शेतकर्‍यांच्या जागेतून असून, त्याबाबत शेतकरी व कंपनी दोघांमध्ये भाडेकरार झाला होता, मात्र त्या करारानुसार पैसे मिळाले नसल्याने आपण अखेरचे पाऊल म्हणून कंपनीचा रस्ता बंद केल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात तीन ठिकाणी गृहप्रकल्प राबवणार्‍या एक्सर्बिया कंपनी आणि शेतकरी असा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. बालाजी दशरथ झांजे यांच्यासह त्यांचे भाऊ, आई व बहीण यांची सामायिक नावे असलेली वरई तर्फे वरेडी येथील सर्व्हे नं. 15/6/अ/1 ही जमीन त्यांच्या ताबेकब्जात आहे. या जमिनीला लागून एक्सर्बिया कंपनीचा सर्वसामान्यांना परवडेल अशा अफोर्डेबल होमचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचा रस्ता  झांजे कुटुंबीयांच्या जमिनीतून जात असल्याने कंपनीने विलास झांजे यांच्याबरोबर 2010 साली जमिनीच्या वापराबदल्यात  कायमस्वरूपीचा भाडेकरार करून घेतला होता, मात्र मध्यंतरी कंपनीकडून भाड्याचे पैसे मिळत नसल्याने आपली जमीन शेतकर्‍यांनी ताब्यात घेऊन कंपनीचा रस्ता दगड टाकून बंद केला. त्याबाबत कंपनीने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी शेतकरी बालाजी झांजे, विलास झांजे व रवींद्र झांजेंना रस्ता मोकळा करण्याबाबत सांगितले, मात्र शेतकरी आपल्या जमिनीवरील कंपनीचा रस्ता मोकळा करून देत नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यामुळे पोलिसांविरोधातही शेतकरी आक्रमक झाले आहेत. जमिनीचा व्यवहार किंवा भाडे मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

एक्सर्बिया कंपनीने गेली चार वर्षे भाडे न दिल्याने आम्ही रस्ता बंद केला आहे. कंपनीतले काही लोक आम्हाला दमदाटी करत आहेत. तसेच पोलीसदेखील आमची तक्रार घेत नाहीत. जोपर्यंत कंपनी भाडे देणार नाही, तोपर्यंत आम्ही रस्ता खुला करणार नाही.

-रवींद्र झांजे, शेतकरी, वरई, ता. कर्जत

गैरसमज झाल्यामुळे शेतकर्‍यांनी दोन दिवस रस्ता बंद केला होता, परंतु शेतकर्‍यांशी बोलणी करून मार्ग निघाला आहे. दोन दिवसांत शेतकरी आणि कंपनीचा व्यवहार पूर्ण होईल. सध्या शेतकर्‍यांनी रस्ता खुला केला आहे.

-विश्वनाथ फाळके, उपाध्यक्ष, एक्सर्बिया कंपनी

आमच्याकडे एक्सर्बिया कंपनीची तक्रार आली होती. त्यानुसार आम्ही शेतकर्‍यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही भारतीय दंड विधान 341 अन्वये अडवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

-अविनाश पाटील, सहाय्यक निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply