Breaking News

लढवय्ये सूर्याजी मालुसरेंची समाधी उपेक्षित

हिंदवी स्वराज्यातील तहामध्ये गमावलेले किल्ले परत भगव्याखाली आणण्याच्या मोहिमेची सुरुवात कोंढाणा किल्ला ताब्यात घेऊन कामगिरी फत्ते करून करण्यात आली. याकामी तान्हाजी मालुसरे धारातिर्थी पडले तर मावळ्यांमध्ये वीरश्री संचारण्यासाठी त्यांचे बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांनी दिलेली ’बाप धारातिर्थी पडला म्हणून पळून का रे जाता? गडाचा दोर कापला आहे…लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा…’ ही चिथावणी इतिहासात अजरामर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अखेरच्या श्वासापर्यंत लढावूपणे साथ देणार्‍या नरवीर सूर्याजी मालुसरे यांचा मृत्यू साखर येथे झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने पार्थिव मांडीवर घेऊन सती जाण्याचा निर्णय घेतला. ही समाधी साखर येथे गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित अवस्थेत दिसून येत असल्याची खंत साखर येथील वंशज अनिल ज्ञानोबा मालुसरे यांनी  व्यक्त केली.

कोंढाण्याच्या कामगिरीवर नरवीर तान्हाजी मालुसरे किल्लेदार उदेभान खाशा याच्यासोबत तुंबळ युध्दात दोघेही धारातिर्थी पडल्यानंतर सभासद बखरीमध्ये असलेल्या उल्लेखानुसार ’मग सूर्याजी मालुसरे (तान्हाजीचा भाऊ) याने हिंमत धरून कुल लोक सावरून उरलेसुरले राजपूत मारले.’ किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याची पण तान्हाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले ’एक गड घेतला, पण एक गड गेला.’ माघ वद्य नवमी दि. 4 फेब्रुवारी 1672 च्या रात्री हे युध्द झाले. कोंढाण्याची कामगिरी फत्ते करण्यात सूर्याजी मालुसरे यांचा सिंहाचा वाटा दिसून येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बलिदानाचा ’गड आला पण सिंह गेला’ नाट्यमय उल्लेख सर्वषृत असला तरी बखरीमध्ये ’एक गड आला, पण एक गड गेला’ अशी नोंद दिसून येत आहे. त्याच बखरीमध्ये सूर्याजी मालुसरे यांचा उल्लेख कोंढाण्याची मोहीम फत्ते करण्याबाबत झाला आहे. शाहीर लहरी हैदर यांच्या ऐतिहासिक पोवाड्यामध्ये ’तान्हाजी व सूर्याजी दोघे बंधू। कल्पनेचा सिंधू॥ जणू का रवि इंदू। हेच दोन्ही हात शिवाजीचे खास॥ यांच्या साह्याने मराठी राज्यास। स्थापिले शिवाजीने दक्षिण देशास॥ कोंढाणा किल्ला घेण्याचा। हेतू शिवाजीचा॥ निश्चित होऊनी साचा। कळविला बेत या दोघा बांधवांस॥ ऐकून आले स्फूरण दोन्हीस। म्हणती महाराज आज्ञेचाच अवकाश’ यातील प्रसंगावरून सूर्याजी आणि तान्हाजी या दोन्ही भावांवरच संपूर्ण कोंढाण्याची कामगिरी सोपविली असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालुसरे आणि मालुसरे परिवारातील धुरिणांच्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांची समाधी उमरठ येथे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्कालीन गोविंदबुवा कळंबे आणि कळंबे परिवारातील ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन 1930 साली समाधीस्थळ प्रकाशझोतात आणले. या ठिकाणी पुण्यतिथी उत्सव सुरू केला. यानंतर तत्कालीन कुलाबा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात उत्सव सुरू झाला. पेण येथील तत्कालीन इतिहास संशोधक परशुराम रामचंद्र दाते यांनी मालुसरे वंशजांसोबत चर्चा करून मालुसरे घराण्याचा इतिहास व्यवस्थितपणे पुस्तकरूपाने मांडला. नरवीरांचा इतिहास प्रकाशझोतात आणणारे अंबाजी मालुसरे यांचा सत्कार उमरठ येथे 1965मध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वर्गीय प्रभाकर पाटील आणि साखरचे जिल्हा परिषदेचे तेव्हाचे सभापती विठोबाअण्णा मालुसरे यांनी उमरठ येथे स्मृतिदिन व शौर्यदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. उमरठ हे यामुळे चांगल्या प्रकारे चर्चेत आले, मात्र सूर्याजी मालुसरे यांची समाधी म्हणावी तशी प्रकाशझोतात आली नाही.

मालुसरे कुलोत्पन्न अनिल मालुसरे यांनी या वेळी बोलताना स्व. विठोबाआण्णा मालुसरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध केल्यानंतर या समाधीस्थळी एका बाजूला गडकोटासारखे बांधकाम करण्यात आले. यानंतरही निधी उपलब्ध झाला. या ठिकाणी सभामंडप आणि अन्य विकासकामांची गरज असून नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम पुत्र रायबाच्या लग्नाचा बेत पुढे ढकलून बलिदान दिल्याने थोर आहे तसाच त्यांच्या बलिदानाप्रमाणेच नरवीर सूर्याजी मालुसरे यांनी कोंढाणा पुन्हा हिंदवी स्वराज्याच्या भगव्याखाली आणण्याचे काम केल्याने तो पराक्रमही प्रेरणादायी असल्याचे आवर्जून सांगितले, तसेच तहात दिलेले सर्व 23 किल्ले परत हिंदवी स्वराज्यात आणण्यासाठी नरवीर सूर्याजी यांनी तान्हाजींच्या पश्चात मिळालेल्या सुभेदारीच्या माध्यमातून स्वामीनिष्ठ राहून छत्रपती शिवाजी महाराजांना असीम साथ दिली, अशी माहिती देत पोलादपूर तालुक्यातील साखर हे नरवीर सूर्याजींचे निर्वाणस्थान आहे, तर सिंहगड हे नरवीर तान्हाजींचे निर्वाणस्थान असल्याचे इतिहासात नमूद केले असताना नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी दरवर्षी होणार्‍या उत्सवाप्रमाणेच नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी उत्सव साजरा होऊन प्रेरणादायी इतिहास सर्वतोमुखी करण्याऐवजी त्याकडे होणारे दुर्लक्ष खेदजनक असल्याचे सांगितले.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply