कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील पोटल पाली ते भालिवडी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्याचे खड्डे भरावेत अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घातले आणि गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी ते भिवपुरी पॉवर स्टेशन या मार्गाचे काम 9 सप्टेंबर 2014 रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन कोटी 76 लाख 19 हजार रुपये खर्च करून करण्यात आले होते. मात्र, देखभाल, दुरुस्तीचा कालावधी संपल्यानंतर पावसाळ्यात या मार्गाच्या पोटल पाली ते भालिवडी या टप्प्यातील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गावरील भालिवडी, आंबोट, पोटल, पाली व तीन आदिवासी वाड्यांमधील नागरिकांसह व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी वाहतूक करणारी वाहने व प्रवासी यांना प्रवास करणे मोठी जिगरीचे झाले होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली व या रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरल्यास पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे सोपे होईल, असे सांगितले. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कर्जत येथील उपविभागीय अभियंता कार्यालयात वारंवार चर्चा व निवेदन सादर करून सदर रस्ता प्रवासायोग्य करण्यात यावा, अशी मागणी केली होती. आमदार थोरवे यांच्या सूचनेची बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत पोटल पाली ते भालिवडी या मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली असल्यामुळे येणार्या गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पावसाळ्यात भालिवडी ते पोटल पाली या मार्गावर जागोजाग खड्डे पडले होते. गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील खड्डे भरण्यात यावेत, याबाबत स्थानिक आमदार महेंद्र थोरवे व जिपचे कर्जत उपविभागीय बांधकाम अभियंता यांच्याशी अनेकवेळा चर्चा करण्यात आली होती. गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील खड्डे भरण्यात येत आहेत, त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास सुखकर होईल.
-विलास श्रीखंडे, ग्रामस्थ, पोटल, ता. कर्जत