Breaking News

दुग्धव्यवसायासाठी तरुणाची धडपड

कोकणात पावसाचे प्रमाण देखील मोठे, जलसिंचनासाठी प्रकल्प देखील भरपूर, पण कोकणातील हे पाणी देखील वाया आणि शेतकर्‍याची मेहनत देखील वाया. हे चित्र कुठेतरी बदलणे आवश्यक आहे. या हेतूने परदेशातील नोकरी सोडून आलेल्या अमजद काझी या तरुणाची गेली वर्षभर धडपड सुरु आहे. महाड तालुक्यातील शेतकर्‍यांनी दुग्धव्यवसाय सुरु करून विकास साधला पाहिजे यासाठी अमजद याने जनजागृती सुरु केली आहे.

भात हे कोकणातील एकमेव पिक. सद्या या पिकातून उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. पूरक शेतीला तितकेसे मार्केट उपलब्ध नाही. यामुळे शेतकरी दुग्धव्यवसायात मागे पडली. विविध प्रकल्पातून भातशेती ओसाड पडू लागली. तरुणांच्या स्थलांतरामुळे पडीक शेतीचे प्रमाण वाढले. अशा अनेक कारणांमुळे भात शेतीचे नुकसान होत आहे. सिंचन प्रकल्पातून पाणी ऊपसा केवळ पिण्यासाठी होत आहे. स्थानिक पातळीवर भात किंवा अन्य शेतीपूरक उत्पादनाला बाजार उपलब्ध नसल्याने शेतकरी शेतीपूरक व्यवसायात देखील तितकासा यशस्वी झालेला नाही. हि खंत मनात ठेवून परदेशातील नोकरी करून परतलेल्या अमजद काझी याने गेली सहा वर्ष महाड सह अन्य भागात जावून दुग्ध व्यवसायाची माहिती घेण्यास सुरुवात केली. दुग्ध व्यवसायात कोकणात येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या आणि याबाबत जनजागृती करून शेतकर्‍यांना पशु पालनाकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

अमजद इब्राहीम काझी असे या तरुणाचे नाव असून महाड तालुक्यातील जिते या गावाचा हा रहिवाशी आहे. आखाती देशात नोकरी करून परत फिरलेल्या या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. गावातच दुग्धजण्य पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी डेअरी प्रकल्प हातात घेतला आहे. डे फ्रेश या नावाने डेअरी प्रोजेक्ट लवकरच सुरु केला जाणार आहे. मात्र केवळ या प्रकल्पावर थांबून जमणार नसल्याचे लक्षात येताच त्याने महाड तालुक्यात गेली वर्षभर गावागावात जाऊन बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यातून शेतकर्‍यांना दुग्धव्यवसाय कसा फायदेशीर आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. महाड तालुक्यातील वाढती लोकसंख्या पाहता दुधाची मागणी वाढली आहे. यामुळे परजिल्ह्यातून दुध मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते. शेतकर्‍यांनी भातशेती बरोबर जोड धंदा म्हणून गाई किंवा म्हैस पालन करून विकास साधला पाहिजे असे अमजद याने पटवून देण्यास सुरवात केली आहे. ज्या गावात बैठका घेतल्या त्या गावातच शेतकर्‍यांनी सोसायटी बनवून सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यास काझी पुढाकार घेत आहे.

या जोड धंद्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना जोड धंदा उपलब्ध होणार आहे, शिवाय रोजगार देखील निर्मित होईल अशी आशा अमजद याने व्यक्त केली. ज्या सोसायट्या दुध व्यवसायासाठी पशुपालन करतील त्यांना खाद्य, औषधपुरवठा सवलत किंवा स्वस्त दरात कसा निर्माण करता येईल याबाबत प्रयत्न सुरु केला आहे. जनावरांचे खाद्य आणि चारा निर्मितीचे तंत्र देखील शेतकर्‍यांना दिले तर घरच्या घरी याचे उत्पादन करून शेतकरी हा शेतीपूरक व्यवसाय स्वीकारतील शिवाय शेतीमधील पारंपारिकता जपली जाईल आणि तालुक्यातील दुग्ध व्यवसायामुळे धवल क्रांती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, अशी आशा अमजद काझी याने प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना व्यक्त केली.

-महेश शिंदे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply