देशातील नवे सहस्त्रक उजाडून दोन दशके उलटली तरीही आपल्या समाजात अशा मध्ययुगीन काळातील भासणार्या घटना घडतात ही बाब अत्यंत दु:खद आणि चिंता वाढवणारी आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत करणार्या भारतातील महिला आजही पुरुषप्रधान विकृत कल्पनांचा बळी ठरतात ही आपल्या समाजातील एक प्रमुख विसंगती आहे. दारोडा या हिंगणघाट नजीकच्या गावात पसरलेली शोककळा ही एका गावापुरती सीमित नसून संपूर्ण समाजालाच शोकाकूल करणारी आहे. एकतर्फी प्रेमाच्या विकृत हट्टापायी भर चौकात दिवसाढवळ्या पेटवून दिल्या गेलेल्या त्या दुर्दैवी प्राध्यापिकेने अखेर आपला जीव गमावला. 35 टक्के जळालेल्या अवस्थेत त्या तरुणीने तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिली. ती अखेर अपयशी ठरली. ज्या विकी नगराळे नावाच्या नराधमाने हे कृत्य केले तो न्यायालयीन कोठडीत जिवंत आहे आणि केवळ स्त्री असल्याचा गुन्हा केलेली ती युवती नाहक जीव गमावून बसली आहे. याला दैवदुर्विलास म्हणावे की विकृतीचा खेळ हाच प्रश्न आहे. गेले आठवडाभर नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात त्या तरुणीवर शर्थीचे उपचार सुरू होते. या दुर्दुैवी घटनेनंतर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज यशस्वी ठरावी त्यासाठी अवघा महाराष्ट्र प्रार्थना करीत होता. हिंगणघाट येथील दुर्दैवी तरुणी असो की सिल्लोड येथे जळीतकांडाला बळी पडलेली विवाहिता असो किंवा आठ वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीमध्ये घडलेले निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरण… ही सारी अशाच पुरुषी विकृत मानसिकतेची उदाहरणे आहेत. अशा प्रकारांना अंत नाही का असा सवाल कुठल्याही सुजाण नागरिकाच्या मनात उमटल्याशिवाय राहणार नाही. आठ वर्षांपूर्वी, सामुहिक बलात्कार व पाशवी अत्याचाराला बळी पडल्यानंतर निर्भया आपल्यातून निघून गेली. परंतु तिचे चारही गुन्हेगार अजूनही फासावर लटकू शकलेले नाहीत. हे आपल्या देशातील निराशाजनक वास्तव आहे. विकृत गुन्ह्यानंतरही असे नराधम दीर्घकाळ शिक्षेविना जिवंत राहू शकत असतील तर सामान्य स्त्रियांनी न्यायासाठी कोणाकडे धाव घ्यायची? या सवालाला आजतरी आपल्याकडे उत्तर नाही. न्यायव्यवस्था आपल्या गतीने काम करीत असते. विलंबाने मिळालेला न्याय, न्याय मानला जात नसला तरी घाईघाईने केलेला निवाडा न्याय्य असेलच असेही म्हणता येणार नाही. हिंगणाघाटच्या निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही अपेक्षा रास्तच आहे. परंतु केवळ राजकारणासाठी आक्रस्ताळी विधाने करून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम नेतेमंडळींनी टाळायला हवे. हिंगणघाटच्या प्राध्यापिकेचा मृत्यू हा सर्वांनाच चटका लावणारा आहे. शिवाय तो एक समाज म्हणून आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे. हैदराबाद येथे बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीचे गुन्हेगार तेथील पोलिसांनी एन्काऊंटर करून यमसदनास धाडले होते. अशाच प्रकारचा न्याय हिंगणघाटच्या गुन्हेगारास देखील द्यावा अशी काही लोकांची भावना आहे. सदर आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे, अशीही मागणी हिंगणघाट येथील संतप्त मोर्चेकर्यांनी केली. त्यांच्या संतापाचा उद्रेक होणे निश्चितच समजून घेण्याजोगेे आहे. मुद्दा उरतो तो अविलंब न्यायाचा. त्यासाठीच सुसंस्कृत समाज म्हणून आपण सार्यांनी एकजुटीने झुंज द्यायला हवी. त्यासाठीचे शस्त्र म्हणजे आपल्या ठायी असलेली विवेकबुद्धीच आहे. हिंगणघाटच्या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. आपली सामाजिक झुंज यशस्वी करणे आपल्याच हाती आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …