Breaking News

सुधागडातील कवेळे धरणाला गळती

बंदिस्त जलवाहिन्या नादुरूस्त

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या बंदिस्त जलवाहिन्या (पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) अनेक ठिकाणी गाळ व मुळ्या जाऊन तुंबल्या आहेत. त्यामुळे धरण व जलवाहिन्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

सिंचनाच्या उद्देशाने लघु पाटबंधारे विभागामार्फत 16.68 लाख रुपये खर्च 1973 साली कवेळे धरण उभारण्यात आले. या धरणाचे सिंचन क्षेत्र 182 हेक्टर आहे. सुधागड तालुक्यातील इतर चार धरणांपेक्षा सर्वाधिक सिंचनक्षेत्र या कवेळे धरणाचे आहे. कवेळे धरणाच्या पाण्याचा उपयोग कवेळे, वाघोशी, भैरव, उद्धार, पिलोसरी, वाफेघर, विडसई आणि येथे असलेल्या आदिवासी वाड्यांना होतो. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून धरणाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे धरणाला गळती लागून पाण्याचा अपव्यय होत आहे.

धरणाला गळती लागल्याने होत आहे नुकसान

धरणाला गळती लागून पाणी वाहून जात आहे. बंदिस्त जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्या आहेत तर काही ठिकाणी त्यांना छिद्र पाडून पाणी चोरी केली जात आहे. जलवाहिन्या तुंबल्यामुळे शेवटच्या शेतापर्यंत पाणी जात नाही. पाणी मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे.

धरणापासून काढलेल्या कालव्यांच्या पाण्यावर पूर्वी  भातशेती केली जायची. आता जलवाहिन्या चोकअप झाल्यामुळे शेवटपर्यंत पाणी मिळत नाही. त्यामुळे लोक शेती करीत नाहीत. काही प्रमाणात कडधान्ये करतात.

-अंकिता चिले, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत वाघोशी, ता. सुधागड

अतितातडीचे म्हणून कवेळे धरणाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी दरवर्षी स्थानिकांची बैठक घेतली जाते. बंदिस्त जलवाहिनींची किरकोळ दुरुस्तीदेखील केली जाते.

-आर. के. सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply