कर्जत : प्रतिनिधी
आपल्या देशाने अनेक युद्ध केली, अनेक जिंकली. अगदी पुर्वीपासून युद्धाचे स्फुल्लिंग महिलांनी जागे ठेवले असल्याचे आपण वाचलेले आहे, अनुभवलेले आहे. आतातर महिलासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सैन्यदलात आहेत. महिलांनी आपल्या मुलामुलींना सैन्यात भरती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन वीरमाता अनुराधा गोरे यांनी येथे केले.
कर्जतमधील श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने येथील शिशु मंदिर विद्यालयाच्या सभागृहात वीरमाता अनुराधा गोरे यांचे ’महिला व लष्कर’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. पुरेशी अत्याधुनिक युद्ध सामुग्री असल्यास युद्धात आपल्याला चांगले व लवकर यश मिळेल, असे त्यांनी सांगितले.
मराठी तरुण सैन्य दलाकडे जाण्यास नाखूष असतात त्यांना किमती मोबाईल, किमती वाहने, फॅशनी कपडे घालण्यातच धन्यता वाटते. हे बदलणे गरजेचे आहे. त्यांना सैन्य दलाकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे हे महिलांचे काम आहे. आपल्या मुलींनाही या क्षेत्रात अनेक संधी आहेत, असेही अनुराधा गोरे यांनी स्पष्ट केले.
गोरे यांनी आपल्या व्याख्यानात 1947, 1962, 1971, बांगलादेश मुक्ती, कारगिलपासून आत्ताच झालेल्या पुलवामा स्ट्राईकबद्दल माहिती सांगितली. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
शतक महोत्सवी समितीच्या अध्यक्षा डॉ. विजया पेठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुचेता जोगळेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. दिनेश अडावदकर यांनी वीरमाता गोरे यांचा परिचय करून दिला. या वेळी उपस्थित नगराध्यक्ष व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष दीपक बेहेरे, मोहन ठोसर, विक्रम वैद्य, दिलीप गडकरी, रामदास गायकवाड, रेखा गोरे, गौतम वैद्य, सुभाष नातू, सदानंद जोशी, सुधाकर निमकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.