कर्जत : बातमीदार
माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून शहरातील संभाव्य अडचणी दूर करण्यास सुरूवात झाली आहे. रस्त्यावर कोसळलेली झाडे, रस्त्यावरील निघालेले पेव्हर ब्लॉक, शेवाळामुळे निसरडे झालेले रस्ते, उघडे वीजरोहित्र आणि शार्लोट लेकची सुरक्षितता याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे.
माथेरान परिसरात दरवर्षी सरासरी पाच हजार मिली पाऊस पडत असतो. चार महिने सतत कोसळणार्या पावसाबरोबर अनेक संकटेदेखील येत असतात. त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत झाला आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे, महुसल विभागाचे अधीक्षक दीक्षांत देशपांडे, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शेखर लव्हे, वनक्षेत्रपाल उमेश जंगम, महावितरणचे शाखा अभियंता संतोष पादीर या प्रमुख अधिकार्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले गेले आहे. त्यानंतर शहरातील जागरूक नागरिकांनी समस्यांची माहिती देण्यास सुरुवात केली आणि माथेरान नगरपालिकेची आपत्कालिन यंत्रणा कामाला लागली. महावितरणकडून शहरातील उघड्या वीजरोहित्रांना झाकणे बसविण्यात आली. तर शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी तुटलेले व अर्धवट बाहेर निघालेले पेव्हर काढून त्यात नवीन पेव्हर लावण्यात आले आहेत.
माथेरानमध्ये पावसाळ्यात प्रामुख्याने झाडे कोसळण्याच्या घटना घडतात, यावर्षी झाडे पडली की तत्काळ रस्त्याच्या बाजूला केली जात आहेत. तर कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे तोडण्यात येत आहेत.
सतत कोसळणार्या पावसामुळे माथेरानमधील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांवर शेवाळ तयार होऊन ते निसरडे होतात. ब्लिचींग पावडर टाकून रस्ते निसरडे राहणार नाहीत, याची नगरपालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शार्लोट लेक वाहू लागल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्यांसह पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे, पोलीस अधिकारी शेखर लव्हे, वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांनी धरणाच्या बांधाची पाहणी केली.
पावसाळ्यात दरडी कोसळून माथेरान-नेरळ घाटरस्ता बंद होऊ नये, यासाठी जेसीबी मशीन तयार ठेवण्याच्या सूचना कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियता संजीव वानखेडे यांना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाने घेतलेली खबरदारी लक्षात घेता माथेरानमधील पर्यटन विनाअडथळा सुरू राहण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.