भारत आणि शेजारील देशांना बंदर प्रशिक्षण देण्यासाठी बळकटी आणणार
उरण : वार्ताहर
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)-एपीईसी-अँटवर्प, फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर यांच्या द्वारे 14 फेब्रुवारीला सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या माध्यमातून जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग सेंटरची उभारणी व्यावसायिकांकरिता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बंदरांसाठी सर्वोत्तम केंद्र म्हणून होणार आहे. जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग सेंटर हे जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट), एपीईसी (अँटवर्प, फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर) तसेच पोर्ट ऑफ अँटवर्पच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. जेएनपीटी-एपीईसीने एकत्र 2015मध्ये पहिल्यांदा सामंजस्य करारात सहभाग दर्शवला होता आणि यंदाच्या वर्षी त्यात काही बदल करून कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाकरिता कौशल्यपूर्ण मेरीटाईम प्रोफेशनल्स म्हणजे सागरी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांचे महत्त्व लक्षात घेऊन हा करार करण्यात आला. जेएनपीटी-एपीईसी ट्रेनिंग सेंटर अंतर्गत, एपीईसी प्रशिक्षण संबंधी विश्लेषण राबवणार असून त्यात एपीईसी वरिष्ठ तज्ज्ञ, भारतीय जहाज उद्योग तसेच भारतीय नौवहन मंत्रालयासोबत संयुक्त भागीदारीत कौशल्यविषयक मागणी आणि दरीचे विश्लेषण करून भारतीय उपखंडातील बंदर अधिकार्यांना समर्पक आणि त्यांना उपयुक्त ठरेल, असे प्रशिक्षण वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात येईल. हे सेंटर भारतातील सर्व प्रमुख पोर्ट ट्रस्ट, खासगी बंदरे आणि टर्मिनल्स आणि परदेशातील बंदरे, टर्मिनल्स व बंदरांसंबंधित सरकारी समित्यांशी निगडीत सहभागीदारांकरिता खुले असणार आहे. खास करून सहभागीदारांमधील संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून ज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सर्वोत्तम सराव उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांमध्ये स्मार्ट पोर्ट टेक्नॉलॉजी, बंदरांकरिता मार्केटींग स्ट्रॅटेजी आणि बिझनेस डेव्हलपमेंट, ड्रेडजिंग मॅनेजमेंट, बंदरावरील आरोग्य, संरक्षण, गुणवत्ता आणि सुरक्षा, बंदरे तसेच टर्मिनल्सचा अधिकाधिक वापर अशा विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते.
जगभरात कौशल्यपूर्ण मेरिटाईम प्रोफेशनल्स (सागरी क्षेत्राशी निगडीत व्यावसायिक)ची मागणी वाढली आहे. आमच्या प्रशिक्षण गरजांकरिता निसर्गत: पसंती एपीईसीला होती. कारण बंदरांसंबंधी प्रशिक्षण कार्यक्रमांची विस्तृत श्रेणी 150 हून अधिक देशांमध्ये 14,000 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना देण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आम्ही जेएनपीटी-एपीईसी ट्रेनिंग सेंटरची उभारणी पोर्ट अॅण्ड लॉजिस्टीक ट्रेनिंग सेंटर ऑफ एक्सेलेंस म्हणून करण्यासाठी वचनबद्ध आहोत. तसेच सर्व भागधारकांनी या सुविधेचा अधिकाधिक वापर करावा, ही आमची विनंती आहे.
-संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी