Breaking News

विरोधकांचा अपप्रचार खोडून काढा -आमदार प्रशांत ठाकूर

भाजप पनवेल ग्रामीण मंडल विस्तारित कार्यकारिणीची बैठक उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
साफ नियत आणि स्पष्ट निती घेऊन भारतीय जनता पक्षा काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा आलेख उंचावत आहे, मात्र विरोधक अपप्रचार करून समाजामध्ये विष पसरविण्याचे काम करत आहेत. तो खोटा, अपप्रचार खोडून काढण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागरूकपणे काम करावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) पनवेल ग्रामीण मंडलाच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत केले.
भाजपच्या पनवेल ग्रामीण मंडल विस्तारित कार्यकारिणीची बैठक पनवेलजवळील आकुर्ली येथील काकाजीनी वाडी येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, एस.के. नाईक, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष कमला देशेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, कार्यालयीन चिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते. या बैठकीसाठी तालुका पदाधिकारी, विविध मोर्चा, सेलचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागीय अध्यक्ष, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, भाजप निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी योजना अमलात आणतो या योजना कायम राहण्यासाठी सत्ता आवश्यक असते. त्यामुळे निवडणूक जिंकणे जरूरीचे असते. काँग्रेसच्या काळात योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळत नव्हता. त्या तुरळक आणि फक्त कागदोपत्री असायच्या, परंतु विकासपुरुष नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्याला थेट त्याच्या बँक खात्यात जमा होऊन पारदर्शकता निर्माण झाली. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम झाले. पुढे त्यांनी ते सुप्रीम कोर्टापर्यत टिकवले, मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडीने कोर्टात बाजू मांडली नाही. म्हणूनच ते आरक्षण टिकले नाही. एक, दोन अपवाद वगळता कायम काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राज्यात राहिली आहे. मग अनेक वर्षे सत्ता असतानाही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, असा सवाल उपस्थित करत मराठा आणि ओबीसी सामाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजामध्ये विष कालवण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना अमलात आणल्या गेल्या आहेत. त्या बंद करण्यासाठी नाही तर तहयात सुरू राहण्यासाठी, मात्र या योजनांच्या बाबतीतदेखील सध्या खोटा प्रचार महाविकास आघाडीकडून केला जात आहे. योजना बंद करावी म्हणून काँग्रेस पक्ष न्यायालयात गेला होता असे सांगून योजना लोकांपर्यंत मिळू नयेत यासाठी विरोधक कष्ट घेत आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले. भ्रष्टाचार करणारे सरकारवर टीका करत असतात आणि त्याचे जिवंत उदाहरण पनवेलमध्ये कर्नाळा बँकेचे आहे हा धागा पकडून आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, शेकापवाले सांगतात खातेदारांचे पैसे मिळवून दिले, मात्र प्रत्यक्षात हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच लाखपर्यंतच्या रकमेला दिल्या गेलेल्या विमा संरक्षण निर्णयातून मिळाले आहेत. असे असतानाही शेकापचे पुढारी गमजा मारतात. मग पाच लाखांवरील ठेवी शेकापने खातेदारांना का परत केल्या नाहीत, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला.
पैशासाठी लोकांनी विवेक पाटीलांकडे फेर्‍या मारल्या. ठेवीदार घरी जायचे, तासन्तास बसायचे, मात्र विवेक पाटील त्यांना भेटले नाहीत. जेव्हा खारघरच्या शाखेत खातेदारांनी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही असा निर्धार केला त्या वेळी रात्री साडेदहा वाजता ते भेटायला आले आणि मी पैसे खाल्ले असतील तर स्वतःला जाळून घेईन अशी गर्जना विवेक पाटील यांनी केली होती. मुलाला वाचवताना स्वतः पैसे घेतल्याची कबुली विवेक पाटील यांनी दिली आणि तसे शपथपत्रही केले. मग असे असतानाही शेकापवाले उजळ माथ्याने भ्रष्टाचार्‍याचे बॅनर लावून गमजा मारत आहेत. यावरूनच त्यांची नीती काय आहे ते स्पष्ट होते, असा टोला आमदार प्रशांत ठाकूर यांनी लगावत शेकापच्या खोट्या नीतिमत्तेचा खरपूस समाचार घेतला. समाजाचे हित जपण्याचे काम महायुतीकडून होत आहे, मात्र महाविकास आघाडी अफवांचे पीक आणून लोकांची दिशाभूल करत आहे. संविधान बदलण्याची अफवा विरोधकांनी केली आणि आरक्षण संपणार अशी भीती प्रचारातून घालण्यात आली. अशा प्रकारे लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवून महाविकास आघाडीने जनतेची फसवणूक केली. मुख्य म्हणजे संविधान कधीही बदलले जाणार नाही. त्यामुळे असा कधीही प्रचार झाला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी नवमतदार नोंदणीसंदर्भात आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकार्‍यांच्याशी संघटनात्मक विषयावर चर्चा करत मार्गदर्शनपर संवाद साधला. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल तसेच तळागाळातील लोकांसाठी काम करणार्‍या राज्य सरकार आणि आपापल्या मतदारसंघात विकासकामांचा झपाटा करणारे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला राजेंद्र पाटील यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. भूपेंद्र पाटील यांनी निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा शोकप्रस्ताव मांडला. बैठकीचे प्रास्ताविक प्रल्हाद केणी, सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आनंद ढवळे यांनी मानले.
या बैठकीत कमला देशेकर यांना महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदाचे, तर रेश्मा भूपेंद्र माळी यांना गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीत धामणी येथील शेकाप व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply