Breaking News

कुडपणच्या तरुणाने सुरू केले अळंबी संवर्धन

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम अशा कुडपण गावातील अध्यापक पदविकाधारक तरुण नोकरीच्या प्रयत्नात असताना त्याला अद्याप संधी मिळाली नसल्याने त्याने निराश न होता ‘स्वदेस’ फाऊंडेशनच्या मदतीने आळंबी संवर्धन आणि विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अधिक आषाढ महिन्यापासून सुरू झालेल्या चतुर्मासात मांसाहार वर्ज्य करणार्‍या पोलादपूरकरांना यामुळे मांसाहाराची चव असलेला आळंबीसारख्या शाकाहारी भाजीची उपलब्धता या व्यवसायामुळे होणार आहे.

पोलादपूरच्या दुर्गम अशा कुडपण खुर्दमधील अरुण वसंत चिकणे हा तरुण अध्यापक पदविकेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र आरक्षण आणि परजिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांतील अनागोंदीमुळे तो सध्या नोकरीपासून वंचित राहिला आहे. कुडपण रस्त्यापासून काही पावलांवरच त्याच्या वडिलांनी म्हणजेच वसंत गौर्‍या चिकणे यांनी चार खणांचे प्रशस्त घर बांधल्यानंतर दोन खोल्या नेहमीच्या राहण्यासाठी-वापरासाठी उपयोगात आणल्यानंतर दोन खोल्या बंद असल्याने या खोल्या उपयोगात आणण्यासोबत काही रोजगारनिर्मितीचे प्रयत्न करता येतील काय, याबाबत अरुणने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पोलादपूर येथील ‘स्वदेस’ फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला आळंबी संवर्धनाच्या व्यवसायाची माहिती दिली. त्यानुसार मुंबईतील ‘महाअ‍ॅग्रो’कडून त्याने गवताच्या गाद्या आणि बियाणे मिळविल्यानंतर घरातील खोली प्रकाशरहित बंद केली आणि या आळंबी संवर्धनासाठी आवश्यक कोंदट वातावरण निर्मिती केली. सुमारे 40 वाफ्यांपासून दररोज किलो ते 3 किलो आळंबी मिळेल अशी त्याची अपेक्षा थोड्याफार प्रमाणात पूर्ण होऊ लागली.

आळंबी शाकाहारी भाजी आहे, मात्र मांस-मच्छीप्रमाणे आळंबीचे पदार्थ शिजविता येतात, अशी माहिती असलेले मोजकेच सुशिक्षित या आळंबीची खरेदी अरुणकडून करीत असत. अलीकडे अधिक आषाढ महिन्यामध्ये मांसाहारी लोकांना चतुर्मासामुळे मांसाहार वर्ज्य असल्याने मांसाहाराला पर्याय म्हणून आळंबीचे पदार्थ जेवणात मांसाहार करण्याच्या दिवसांत शिजवून खाण्यासाठी अरुणच्या आळंबीची मागणी वाढली. साधारणतः 35-40 दिवसांत प्रत्येक वाफ्यांतून मिळणार्‍या आळंबी उत्पादनाची विक्री प्रतिकिलो 200 रुपयांनी होऊ लागली असल्याने मटण आणि मच्छीचा हा पर्याय सर्वांच्याच खिशाला परवडणारा ठरला आहे. अरुणने आळंबी संवर्धनाचा हा व्यवसाय लवकरच मोठ्या प्रमाणात वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलादपूर तालुक्यात शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी व्यवसायाअभावी सुशिक्षित बेरोजगार राहिलेल्या तरुणांसमोर अरुण चिकणे या कुडपणसारख्या दुर्गम खेड्यातील तरुणाने आदर्श निर्माण केला आहे.

अळंबी किंवा मशरूमचे औषधी गुणधर्म- मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत. मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त. कमी ऊर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूममध्ये कमी ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे. मशरूममध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास सर्कव्ही रोगापासून बचाव होऊ शकतो. पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करणारे अन्न बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते. दीर्घ मुदतीची पद्धत (26-28 दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (16 ते 18 दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कंपोस्टच्या वजनाच्या 5 ते 10 टक्के या प्रमाणात बी पेरले जाते. 12-15 दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व उत्पादनाकरिता तापमान 12 अंश सेल्सिअस लागते. नैसर्गिक वातावरणात (तापमान 20 अंश ते 30 अंश सेल्सिअस व आर्द्रता 80-90) या मशरूमची लागवड 8-10 महिने करता येते. संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमच्या उत्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. 200 लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी अळंबी उत्पादन घेऊ शकतो. पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. बुरशीच्या वाढीकरिता उबविणे ही महत्त्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान 20 ते 30 अंश सेल्सियस ठेवावे. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान 20 ते 30 अंश सेल्सियस व आर्द्रता 70-75 राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळूवार फवारणी करावी. दिवसातून 3-4 वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा. मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर 4-5 दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. 10 दिवसांनी दुसरे पीक, परत 10 दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात. एका बेड (पिशवी) पासून 900 ते 1500 ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो. ताज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या 200-300 गेजच्या प्लॅस्टिक पिशवीत करतात. मशरूम 4-5 दिवस फ्रीजमध्ये उत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसांत उत्तम वाळते. मशरूम वाळवण्याकरिता 45-50 अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

अळंबीचे भरघोस उत्पादन येण्याकरिता महत्त्वाच्या बाबी- मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी. खोलीतील तापमान 30 अंश सेल्सियस व आर्द्रता 75 राहील याची काळजी घ्यावी. आळिंबी लागवड करणार्‍या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा. काडाचे निर्जंतुकीकरण महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर 10 इंच ठेवावे. रोग, किडीचा, चिलटांचा प्रादूर्भाव झाल्यास नुवान (1 मिली, 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावे) आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादूर्भाव झाला, तर नाही ना, या करिता दररोज निरीक्षण करावे. मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी. अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply