एकीकडे कोरोना महामारीचे जीवघेणे संकट, पावसाचे भयंकर थैमान आणि दुसरीकडे ठाकरे सरकारची अनाकलनीय अनास्था अशा दुहेरी चरकामध्ये अवघा महाराष्ट्र भरडला जातो आहे. याला दुर्दैव असेच म्हणावे लागेल. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने मांडलेला कहर अगदी असह्य झाला आहे. राज्यभरात शेतकर्यांच्या तोंडचा घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. सुलतानाने नाडले आणि अस्मानाने झोडपले तर सामान्य माणसाने जायचे कुठे असा प्रश्न पाडणारे वातावरण सध्या राज्यभरात दाटून आले आहे. मंगळवारी सकाळपासून एकट्या मुंबई महानगरामध्ये जवळपास 300 मिमी पाऊस पडल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये 100 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला होता. त्या दाव्याचे काय झाले याचा अनुभव गेले 24 तास मुंबईकर घेत आहेतच. दरवर्षी पावसाळा येतो आणि मुंबईची तुंबई होते. दरवर्षी पाऊस प्रमाणापेक्षा जास्त पडल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जाते. हे दरवर्षीचे रडगाणे ऐकून-ऐकून मुंबईकरांनी आता सत्ताधार्यांचा नाद केव्हाच सोडला आहे. तीस-चाळीस वर्षे मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेवर सत्ता गाजवून देखील मुंबईकरांच्या जीवनात सत्ताधारी शिवसेना काहीही फरक पाडून दाखवू शकलेली नाही. मंगळवारच्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे सेवा पूर्णत: ठप्प झाल्या. अर्थात अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांपुरत्याच त्या चालू होत्या. बाकीच्या आस्थापना व कार्यालयांना सुटी जाहीर करण्याची पाळी राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासनावर आली. वांद्रे येथील कलानगर आणि आसपासचा परिसर म्हणजे मुंबई नव्हे, याचे भान सत्ताधार्यांना कधी येईल कोण जाणे! मुंबईच्या पालकमंत्र्यांनी आयुक्तांसमवेत दोन एक तासाची चक्कर मारून कलानगर, धारावी रोड येथे छोटासा पाहणी दौरा काढल्याचा उपचार तेवढा पार पाडला. बाकीच्या मुंबईकरांच्या हालास पारावर उरलेला नाही. पण हे झाले मुंबईचे नित्याचे रडगाणे. उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसाने अक्षरश: थैमान मांडले असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती ओढवली आहे. पनवेल परिसरात गव्हाण, वहाळ आदी भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसते आहे. गेल्या महिन्यात विदर्भात तुफान पर्जन्यवृष्टी होऊन हजारो हेक्टर पिके नष्ट झाली होती आणि कित्येकांचे संसार उघड्यावर पडले होते. महापुराचे भयंकर रूप पाहणार्या विदर्भातील लोकांना ठाकरे सरकारने फक्त 18 कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. आता पुन्हा मुंबईसह राज्यभरात पावसाने दिलेल्या नव्या झटक्यामुळे अनेकांच्या जीविताचाच प्रश्न उभा राहिला आहे. कोरोना संकटाशी लढताना सदोदित केंद्र सरकारकडे हात पसरणार्या राज्य सरकारला पावसाच्या संकटाशी लढण्यासाठी पुन्हा केंद्राकडेच पहावे लागेल. कारण कुठल्याही संकटाशी सामना करण्याची क्षमताच या तीन चाकी सरकारमध्ये नाही. मुंबईकर असोत किंवा उर्वरित महाराष्ट्रातील दुर्दैवी पूरग्रस्त दोघांच्याही समोर अनंत अडचणींचा डोंगर उभा आहे. अशा समर प्रसंगी राज्यात सशक्त आणि सक्षम सरकार असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. परंतु महाराष्ट्राच्या दुर्दैवाने आघाडी सरकारला कंगनाशी लढण्यामध्येच अधिक रस आहे. कोरोनाशी नाही की नैसर्गिक आपत्तींशी नाही. मुंबईकरांना तर कुणी वालीच उरलेला नाही. जनजीवन विस्कळीत झाले की मुंबईकर थोडेसे कुरकुरतात आणि निमूटपणे कामाला लागतात. दुर्दैवाचा पाऊस पडतच राहतो.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …