Sunday , September 24 2023

रायगडमधील भूजल पातळी घटली

अलिबाग : प्रतिनिधी

मागली वर्षी पावसाने लवकर निरोप घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठी कमी आहे. जलाशायांच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील घटली आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल

सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने डिसेंबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार मागील पाच वर्षाच्या तुलनेत या वर्षी भूजल पातळीत 0.49 मीटर घट झाली आहे.

मागील वर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली होती. ऑगस्ट महिन्यातच वार्षिक पर्जन्यमानाची पातळी ओलांडली गेली होती, मात्र त्यानंतर पाऊस थांबला. त्यामुळे जलाशयांमध्ये पाण्याचा साठा पुरेसा झाला नव्हता. परिणामी पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. ही भिती खरी ठरत आहे. सध्याच रायगडातील काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता तर भूजलाची पातळी घटली आहे. त्यामुळे पाणीसमस्या गंभीर होणार आहे.

विहिर, बोअरवेल यांच्यावर सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांमधून रायगड जिल्ह्यात 60 टक्के पाणीपुरवठा केला जातो. या जलस्त्रोतांवर भूगर्भात कमी झालेल्या पाणी साठ्याचा परिणाम होत आहे. भविष्यात ही घट सातत्याने वाढल्यास रायगडमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती भूगर्भ सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माथेरान येथे सुमारे 4000 ते 4500 मिमी पडतो, मात्र या परिसरातील विहिरींमधील पाण्याची पातळी मागील पाच वर्षाच्या तुलनेत 0.12 मीटरने घटली आहे. अलिबाग, उरण या तालुक्यांमध्ये खार्‍या पाण्यामुळे भूगर्भातील गोडे पाणी झपाट्याने कमी होत आहे. कुपनलिका, विहिरी यांना खारे पाणी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

रायगड जिल्हा हा मुख्यत्वेकरून बेसाल्ट नावाच्या अग्नीजन्य खडकाने व्यापलेला आहे. या खडकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. प्रामुख्याने म्हसळा, श्रीवर्धन, तळा व मुरूड या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्यावर लॅटेराईट या प्रकाराचा खडक आढळतो. या खडकात काही प्रमाणात पाणी साचून राहते. बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे डोंगरमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जात असल्याने विक्रमी पडणार्‍या पावसाचे पाणी फारसे जमिनीत मुरले जात नाही. त्यामुळे भूजल पातळी घटली आहे.

सुधागड, पोलादपूर तालुक्याच्या डोंगराळ भागात असलेल्या काही नमुना विहिरींमधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झालेली आहे. भविष्याचा विचार करून पाणी जिरवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

-डी. बी. ठाकूर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, रायगड

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply