कोरोनाविरुद्धची लढाई मानवी समाज आणि विषाणू यांच्यातील आहे. अशा संघर्षाच्या प्रसंगी अडचणींचा पाढा वाचण्यात काही हशील नसते. पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन आठवड्यांत हा घातक विषाणू आपण किती प्रमाणात रोखू शकतो त्यावर विषाणूविरुद्धच्या या युद्धात कोणाची जीत होते याचा निकाल लागेल.
आपल्या महान लोकशाही देशामध्ये उठसूठ कुठल्याही कारणासाठी मुंबई बंद, महाराष्ट्र बंद, भारत बंद असे बंद पुकारले जातात. आज वाहतूकदारांचा बंद, तर उद्या एसटी कर्मचार्यांचा बंद, परवा सरकारी कर्मचार्यांचा बंद, तेरवा बँक कर्मचार्यांचा बंद अशा सतराशे साठ बंद आंदोलनांनी आपले वर्ष गाजत असते. या बंदमुळे कोणाच्या मागण्या मान्य होत असल्या तरी जनता मात्र हकनाक वेठीला धरली जाते. सध्याच्या कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत मात्र अशी दीर्घकाळची टाळेबंदी नागरिकांनीच स्वत:वर लादून घेण्याची वेळ आली आहे. गेले महिनाभर कोरोनाने जगभर घातलेले थैमान पाहता काटेकोर काळजी घेणे क्रमप्राप्तच ठरते. हवेतून पसरणार्या या घातक साथरोगामध्ये एकमेकांमधील संपर्क कमीत कमी राहावा यासाठी कडक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. गेले दोन आठवडे कोरोनाच्या साथीने मुंबई आणि महाराष्ट्रात फैलाव केलेला दिसतो. आजमितीस 40पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आढळून आले आहेत. याचा अर्थ संपूर्ण देशात महाराष्ट्रातच कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. मंगळवारी मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयात एका 64 वर्षीय वृद्धाचे कोरोना बाधेनंतर निधन झाले. हा महाराष्ट्रातील पहिला कोरोना बळी होय. कोरोनाचा फैलाव दुसर्या टप्प्यातच रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्यातील आरोग्य व्यवस्था शर्थीने झुंज देत आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव आहे. शाळा-महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स आणि सार्वजनिक बागा व उद्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात गर्दी टाळणे अशक्यप्रायच आहे. मुंबईतील मोठमोठ्या उद्योगसंस्थांनी आपापली कार्यालये तात्पुरती बंद ठेवून कर्मचार्यांना घरूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा देऊ केली आहे हे योग्यच झाले. अधिकाधिक खासगी कंपन्यांनी असे करण्याची गरज आहे. गर्दी टाळण्याचा हा एक प्रभावी उपाय मानावा लागेल. अर्थात संपूर्ण मुंबई आणि परिसर सक्तीने गर्दीमुक्त करण्यापेक्षा नागरिकांनी स्वत:हूनच काही पथ्ये पाळली, तर या कोरोनाच्या साथीला दुसर्या टप्प्यातच अटकाव करणे कदाचित शक्य होईल. मूलभूत स्वच्छता पाळणे आणि गर्दीचा कमीत कमी संपर्क ठेवणे अशी काही पथ्ये पाळली, तर कोरोना विषाणूला एकजुटीने मात देणे सहज शक्य होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूविरुद्धच्या लसीचा शोध शास्त्रज्ञांनी लावल्याचे जाहीर करून त्यातल्या त्यात एक सुखद धक्का दिला आहे. अर्थात ही लस सर्रास उपलब्ध होण्यासाठी अजून बराच काळ जावा लागेल. या लढाईमध्ये शास्त्रज्ञ आघाडीवर आहेत एवढीच बाब ट्रम्प यांच्या घोषणेतून अधोरेखित होते. कोरोनाच्या लसीचा उपयोग होईल तेव्हा होईल, पण स्वयंनिग्रहाच्या जोरावर आपण सारे या विषाणूला हरवू शकतो एवढे लक्षात ठेवले तरी पुरे!