Breaking News

क्रीडापटूही कोरोनामुळे बाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोना विषाणू सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत. क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला असून जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. स्पर्धांना स्थगिती दिली असूनही क्रीडाविश्वात कोरोनाने प्रवेश केला आहे. आतापर्यंत विविध क्रीडाप्रकार खेळणार्‍या क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाली आहे.

इंग्लंड आणि चेल्सी क्लबचा फुटबॉलपटू कॅलम हडसन-ओडोई, फ्रेंच आणि जुव्हेंटस क्लबचा फुटबॉलपटू ब्लेस मातुडी, सायकलपटू दमित्री स्ट्राकोव्ह, इटली आणि जुव्हेंटस क्लबचा फुटबॉलपटू डॅनियल रूगानी, अमेरिकन बास्केटबॉलपटू डोनोवान मिशेल, फ्रान्सचा बास्केटबॉलपटू रूडी गोबर्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसन, न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लॉकी फर्ग्युसन यांची कोरोना चाचणी झाली. यात त्यांना कोरोना झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे, तर इंग्लंडचा फलंदाज अलेक्स हेल्स याला कोरोनाची लागण झाल्याचे पाकिस्तानमधील मीडियाने म्हटले होते, मात्र ते वृत्त साफ खोटे निघाले.

– द. आफ्रिकेच्या खेळाडूंना एकांतवासात जाण्याच्या सूचना

केपटाऊन : कोरोनामुळे भारताविरुद्धची वन डे मालिका रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू जोहान्सबर्ग येथे पोहोचले, पण मायदेशात पोहचल्यावर त्यांना 14 दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर तीन वन डे सामने खेळणार होता. धरमशाला येथे होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या शंभरहून अधिक झाली आणि बीसीसीआयने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब मांज्रा यांनी खेळाडूंना एकांतवासात जाण्याच्या व कोरोना व्हायरसची चाचणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. खेळाडूंनी काही दिवस इतरांपासून दूर राहावे. किमान 14 दिवस त्यांनी एकांतवासात जावे. स्वतः, इतर व कुटुंबीयांना सुरक्षित राखण्यासाठी हा योग्य पर्याय आहे.

-ऑलिम्पिक समितीच्या उपप्रमुखासही लागण

टोकियो : वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द केल्या जात आहेत किंवा त्या पुढे ढकलल्या जात आहे. या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत आणि जपानमध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा स्पर्धेवर करोनाचे संकट आले आहे. त्यामुळे ही स्पर्धा घेऊ नये असे अनेकांचे मत आहे, पण जपानचे पंतप्रधान आणि ऑलिम्पिक समितीच्या प्रमुखांना तसे वाटत नाही. या दोघांच्या मते स्पर्धा नियोजित वेळेत घेतल्या जाव्यात. अशातच एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. जपानच्या ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुखांनाच करोना व्हायरसची लागण झाली आहे. जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांना मंगळवारी कोरोना झाल्याचे समोर आले. ताशिमा याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. खुद्द ऑलिम्पिक समितीमधील उपप्रमुखास करोना झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरच जपान ऑलिम्पिक स्पर्धाचे सुरक्षित आयोजन करू शकेल, का असा प्रश्न विचारला जात आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply