खांदाड आदिवासीवाडीतील बांधवांनी मांडली व्यथा
माणगाव : प्रतिनिधी
नगरपंचायत हद्दीतील मोर्बारोडवरील खांदाड आदिवासीवाडी विकासकामांपासून वंचित असून, वाडीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील आदिवासी बांधवांना विशेषतः पावसाळ्यात फार त्रास सहन करावा लागतो. पाच पिढ्यानंतरही आमच्याकडं रस्ता नायं, अशी व्यथा येथील आदिवासी बांधवांनी प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केली.
माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड आदिवासीवाडीत 25 घरे असून, त्यात सुमारे 150 हून अधिक लोक राहत आहेत. या आदिवासीवाडीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. शौचालय व अंगणवाडी शाळा नाही. शासनाच्या कोणत्याच योजना याठिकाणी राबविण्यात आलेल्या नाहीत. नगरपंचायतीकडे घरकुलसाठी अर्ज भरलेले असतानाही प्रॉपर्टी कार्ड, घरपावत्या अशी अनेक कारणे पुढे करून अद्यापही आम्हाला घरकुल देण्यात आलेले नाहीत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुका आल्यावर वाडीवर येत असतात.त्यानंतर कोणीच विकासकामांच्या बाबतीत या वाडीकडे लक्ष देत नाही, अशी व्यथा वाडीतील आदिवासी बांधव अनंता पवार, जान्या पवार, मधुकर पवार, सुमन काटकर, दुध्या काटकर, रामदास जाधव, बबन पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना मांडली.
खांदाड आदिवासीवाडीच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे.