भाषा व साहित्य संशोधनासंदर्भात इंग्रजी विभागाचा उपक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात नुकतीच भाषा व साहित्याची संशोधन कार्यप्रणाली या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. सीकेटी महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग, इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया (मुंबई चॅप्टर) आणि रिसर्च क्रॉनिक्लर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रुसाने पुरस्कृत केलेल्या या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल आवड निर्माण करणे व त्यांना शिक्षणामध्ये संशोधन कसे महत्त्वपूर्ण आहे हे समजावणे हा होता. त्याचप्रमाणे भावी संशोधकांना इंग्रजी भाषेमध्ये व साहित्यामध्ये उपलब्ध असलेल्या विविध संशोधन पद्धतींबद्दल मार्गदर्शन करणे हाही होता. या कार्यशाळेत देश-विदेशातील 310 संशोधकांनी सहभाग घेतला. प्रत्येक शिक्षकाला असे वाटते की आपण पीएचडी डिग्री संपादन करावी, पण त्यासाठी संशोधनाची कास धरावी लागते. या अनुषंगाने यशस्वी संशोधक बनण्यासाठी लागणार्या गुणांची व कौशल्याची माहिती या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेतून देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला संशोधनाबद्दल कुतूहल असते व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी महाविद्यालयाने या कार्यशाळेच्या आयोजनातून एक प्रयत्न केला. संशोधनाला शिक्षण पद्धतीमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी संशोधकाला स्वत: ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तके वाचावी लागत होती, परंतु संशोधन पद्धतीमध्ये आता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ऑनलाईन माहिती अतिशय सुलभरित्या उपलब्ध होत आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन कुवेत येथील अरब विद्यापिठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. पूजा सीवॉच यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात संशोधनासाठी आवश्यक असलेल्या पद्धतींबद्दल अवगत केले. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. शिवाजी सरगर, हैदराबादच्या इंग्लिश अॅण्ड फॉरेन लँगवेज विद्यापीठाचे डॉ. व्यकंट रेड्डी, इंदूरच्या देवी अहिल्या विश्वविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. अशोक सचदेवा, जीएसीसीचे इंग्रजी विभाग माजी प्रमुख डॉ. उषा चंडेल, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. व्यंकट रेड्डी यांनी इंग्रजी भाषेमध्ये यशस्वी संशोधन कसे करावे व टप्पे याबाबत माहिती दिली. डॉ. अशोक सचदेवा यांनी इंग्रजी साहित्यात संशोधन करण्यासाठी लागणार्या पद्धतींबद्दल अवगत केले. डॉ. उषा चंदेल यांनी संशोधन करण्यासाठी आवश्यक कौशल्यांची जाणीव करून दिली. डॉ. एस. टी. गडदे यांनी शिक्षण पद्धतीमध्ये संशोधनाचे महत्त्व काय हे भाषणात अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी महाविद्यालयाच्या प्रगती आणि कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले यांनी केले. संयोजक म्हणून डॉ. आर. व्ही. येवले, तर सहसंयोजक म्हणून इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया (मुंबई चॅप्टर)चे अध्यक्ष डॉ. सचिन भुंबे व रिसर्च क्रॉनिक्लरच्या व्यवस्थापकीय संपादक डॉ. कल्पना सरगर, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून एस. एन. पारकाळे व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे जॉइंट सेक्रेटरी डॉ. रामकृष्ण भिसे यांनी काम पाहिले.