Breaking News

कळंबोलीतील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : वार्ताहर

कळंबोलीतील नागरिकांनी तेथील विविध समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी मंगळवारी (दि. 17) चर्चा केली. कळंबोली-रोडपाली ते कामोठे (मानसरोवर) रेल्वेस्थानक लिंक रोड कृती संघटना, स्त्रीशक्ती फाऊंडेशन व हरित कळंबोली ज्येष्ठ नागरिक संघ या चर्चेत सहभागी झाले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे

आश्वासन दिले.

या बैठकीस स्त्रीशक्ती फाऊंडेशनच्या विजया कदम, आझाद संघटनेचे भरत कोरडे, आशीर्वाद नवतरुण मित्र मंडळाचे महेंद्र खबाले, पोलीस मित्रचे सुधीर अहिरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग हातेकर, जागृती महिला मंडळाच्या आरती चौधरी आदी उपस्थित होते.

या वेळी झालेल्या चर्चेत प्रस्तावित कळंबोली-कामोठे-मानसरोवर रस्ता लवकर तयार करावा, रस्त्यांची डांबरीकरणाची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावीत, पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई व रस्त्यावर वाहणारे पाणी बंद व्हावे, सेक्टर 1मधील मैदानातील डेब्रिज साफ करावे, महावितरणच्या अधिकार्‍यांनी पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी कामे करून घ्यावीत, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. मैदानात उघड्यावर बसणार्‍या दारूड्यांवर कारवाई व्हावी व परिसरातील अवैध धंदे थांबवण्यासाठी सिडको व पोलीस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, मॅकडोनाल्डसमोरील ट्रॅव्हल्स अतिक्रमणाबाबत मुख्य रस्ता व सर्व्हिस रोडमधील जागा नियोजित करून बसथांबा मागे घेऊन जागा वाढवून घ्यावी (यासाठी त्यांनी पीडब्ल्यूडीच्या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून पालिकेला पत्रव्यवहार करायला सांगितले आहे.), ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रासारख्या सुविधा मिळाव्यात, यांसारखे विषय उपस्थित करण्यात आले. कळंबोलीतील समस्या मार्गी लागण्यासाठी संबंधित विभागांचेे लक्ष वेधण्यात येईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. आमदार आपल्या दारी अशी संकल्पना मांडून जनता दरबारची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. त्यालाही आमदार ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply