Breaking News

कोरोनाविरुद्ध लढा देऊ या!

कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. दुसर्‍या महायुद्धाचा विपरीत परिणाम जितक्या देशांवर झाला नव्हता त्याहून अधिक देश सध्या कोरोनानामक विषाणूमुळे विदारक परिस्थिती अनुभवत आहेत. चीनमधून पसरलेल्या या महामारीचा फैलाव वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. जगाने यापूर्वी अनेक संसर्गजन्य रोग, आजार अनुभवले आहेत. त्यात प्लेगचा प्रकोप सर्वांत जास्त होता. याशिवाय बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू, इबोला, झिका, निपाह, सार्स यांसारख्या विषाणूंनी वेगवेगळ्या देशांमध्ये अनेकांचा बळी घेतल्याची नोंद आहे. त्यानंतर आता एकविसाव्या शतकात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. या विषाणूचे उगमस्थान चीनमधील वुहान प्रांत असून, गेल्या डिसेंबर महिन्यात सर्वप्रथम हा विषाणू तेथे आढळून आला होता. नववर्षात इतर शहरांमध्ये त्याचा फैलाव झाला आणि बघता बघता त्याने जगातील इतर देशांतही शिरकाव केला. आशियातील चीनपाठोपाठ युरोप खंडातील इटलीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. या देशात कोरोना इतक्या वेगाने पसरला की मृतांच्या आकड्यामध्ये इटलीने चीनला मागे टाकले आहे. आपल्या भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. चीन, इटलीच्या तुलनेत हा आकडा जास्त नसला तरी सुरुवातीला इटलीतसुद्धा रुग्णांची संख्या नगण्य होती, पण हा प्रगत देशही आता हतबल झालेला दिसून येतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि निरनिराळ्या राज्य सरकारांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरही उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येकाने शासन-प्रशासनाला सहकार्य करणे नागरिकांच्याच हिताचे आहे, मात्र काही बेफिकीर लोक नियम वा आवाहनाचे पालन न करता अजूनही बिनधास्तपणे वावरत आहेत. ते सर्वस्वी चुकीचे आहे. काही दिवस जर आपण सतर्क राहून दक्षता घेतली, तर नंतर आपल्यालाच अधिक चांगले जीवन जगता येऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आलेल्या खोट्या व चुकीच्या माहितीला तसेच अफवेला बळी न पडता शासनाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे जरुरीचे आहे. अनेक जण आलेल्या पोस्टची शहानिशा न करता ती पुढे पाठवतात. हासुद्धा गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे सावधान राहा! कोणताही रोग, आजार वा व्याधी रोखण्यासाठी महत्त्वाची असते ती स्वच्छता. कोरोना तर संसर्गजन्य आहे. ते पाहता स्वच्छतेविषयी अधिक जागरूक असणे गरजेचे बनले आहे. कोरोना आलाय म्हणूनच कशाला दैनंदिन जीवनातही स्वच्छता ही निरामय आरोग्यासाठी मोलाची ठरते. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेचा वसा अंगीकारणे काळाची गरज बनली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेदरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. यामागचा उद्देश कोरोना रुग्णांची जी साखळी बनत चालली आहे ती तोडणे हा आहे. एरवी आपण सारे जण चांगल्या कामासाठी एकजूट होत असतो. आता नेमके त्याच्या उलट करायचे आहे. कुणीही रविवारी दिवसभर घराबाहेर न पडता कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी स्वत:ला बंदिस्त करायचे आहे. त्याचबरोबर कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या वैद्यकीय व अन्य यंत्रणांना प्रोत्साहन देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता टाळी, थाळी, घंटी वाजवून प्रतिसाद द्यायचा आहे. असे केल्याने त्यांच्यात काम करण्याची ऊर्जा नक्की वाढेल. गोष्ट छोटी आहे, पण अखिल मानवजातीसाठी मोठी आहे. मंडळी, कोरोनामुळे एक चांगले झाले ते म्हणजे सर्व जण भेदभाव विसरले. आपल्या भारताची तर हीच खासियत आहे. जेव्हा एखादे संकट देशावर येते तेव्हा ही विविधतेतील एकता अधिक उठून दिसते. आपल्याकडे कोरोना हळूहळू पाय पसरू लागला आहे. त्याला वेळीच रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. किमान प्रत्येकाने या विषाणूची आपल्याला लागण होऊ नये म्हणून दक्ष राहून काळजी घेतली, तरी त्याचा फैलाव रोखण्यास मदत होईल. चला तर मग कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी नव्या जोमाने सज्ज होऊ या!

-समाधान पाटील, अधोरेखित

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply