
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतील विधानभवनात 24 फेब्रुवारीपासून सुरू झाले आणि या मार्चमध्ये विधानभवनातील सुरक्षा रक्षक म्हणून सुमारे 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर शरद मानसिंग पवार हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल…
विधानभवनातील सुरक्षा रक्षक शरद पवार हे 30 वर्षांपूर्वी विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यामध्ये सामील झाले. मुंबई पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून कार्यरत असणारे शरद पवार हेही आपल्या मोठ्या शरदरावांच्या बारामतीचेच. भारतीय राजकारणात चाणक्य म्हणून ओळखण्यात येणारे शरद पवार हे बारामतीच्या काटेवाडीचे, तर विधानभवनातील सुरक्षेवर तैनात असणारे शरद पवार हे बारामती तालुक्यातील जोगवडी गावचे.

सुमारे 50 वर्षांपूर्वी 16 एकर जमीन कुळकायद्यात गेलेले मानसिंग नारायण पवार आणि लीलावती मानसिंग पवार या दाम्पत्याने आपले उरलेले घरही पडले म्हणून तडक मुंबई गाठली. कोळसा कंपनीत नोकरीला लागले. करी रोड लालबागच्या आश्रयाला आणि उपजीविकेसाठी आलेल्या या पवार दाम्पत्याला शरद आणि चार मुली अशी अपत्ये झाली. शरदचा जन्म मुंबईत 22 मार्च 1962 रोजी झाला. घरची हलाखीची परिस्थिती असली तरी समाजसेवा या पवार कुटुंबीयांमध्ये ठासून भरलेली आहे. मानसिंगराव यांनी मरणोत्तर देहदान केलेय. आई लीलावती या करी रोड येथे पदपथावर भाजीविक्रेत्या म्हणून काम करतात. त्यांच्या वयाचा अमृत महोत्सव झाला. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर उपजीविकेसाठी नोकरी करणे अपरिहार्य होते. 1986मध्ये शरद पवार हे पोलीस दलात भरती झाले आणि 1990 साली विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात रुजू झाले. मनमिळावू स्वभाव असल्याने विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून येणार्या प्रत्येक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या बरोबर शरद पवार हे हमखास दिसणार. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना हे शरद पवार सुरक्षेसाठी तैनात असत. 1990पासून त्यांनी शरद पवार, सुधाकरराव नाईक, डॉ. मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि आता उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द जवळून पाहताना मधुकरराव चौधरी, दत्ताजी नलावडे, दिलीप वळसे-पाटील, नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष तसेच जयंतराव टिळक, प्रा. नारायण सदाशिव फरांदे, शिवाजीराव देशमुख, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कार्याचा अभ्यास करता आला. दिना बामा पाटील, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आदी नेत्यांचाही त्यांना सहवास लाभला.
मुंबई पोलीस दलात दत्ता पडसलगीकर, संजय बर्वे यांचे शरद पवार यांना मार्गदर्शन लाभले. काळाचौकीजवळ वास्तव्य असल्याने मणिशंकर कवठे, नारायण घागरे, विवेक खाड्ये आदींचाही संपर्क आला. कौटुंबिक परिस्थिती स्थिरस्थावर झाली आणि मुलगा शशांक एमबीए आणि मुलगी सुष्मिता कॉम्प्युटर इंजिनिअर झाली. बारामतीचे असल्याने शरद पवार यांना तिथल्या नेत्यांपासून सर्वच बाबतीत ममत्व भाव असणे ओघाने आलेच. त्यातही आता रोहित पवार हे आमदार म्हणून निवडून आले असल्याने आणि सुरक्षा रक्षक शरद पवार हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शरद पवार यांना भविष्यातही ’अच्छे दिन’ आबाधित राहोत, यासाठी शुभेच्छा दिल्या, तसे पत्रही दिले. या शरद पवार यांचा सर्वांशी चांगला संबंध असल्याने ते सेवानिवृत्त होणार हे कळताच विधानभवनात कर्तव्यावर असलेल्या प्रसार माध्यमातील मित्रमंडळींनी त्यांचा सत्कार घडवून आणला. समाजसेवेचे बाळकडू प्यायलेल्या या शरद पवार यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य अन् ठणठणीत आरोग्य देवो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!
-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर