राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अर्थात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आदींचा पुरवठा तसेच इतर आवश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. जिल्ह्यांच्या सीमाही आता बंद करण्यात आल्याने प्रवासावर मर्यादा येतील. त्याने काही प्रमाणात जनता भयभीतही होईल. पण त्याला आता इलाज नाही.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेले लॉकडाऊन आजही अनेकजण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. कृपा करून स्वत:ला वाचवा, आपल्या परिवाराला वाचवा, आदेशांचे गांभीर्याने पालन करा, असे आवाहन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार एका ट्वीटमार्फत केले. सर्व राज्य सरकारांनी लोकांना नियम व कायद्यांचे पालन करण्यास भाग पाडावे असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला देशभरातील जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मोदींच्याच आवाहनानुसार जनतेने टाळ्या वाजवून आणि घंटानाद करून कोरोनाविरुद्धची लढाई लढणार्या डॉक्टर, नर्सेस, अन्य वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांचे आभारही मानले. मोदींच्या एका हाकेसरशी अवघ्या देशभरातील जनता कशी एकवटते याचे मनोहारी दर्शन रविवारच्या या आभार प्रदर्शनातून घडले. आपण सारे एकत्रितरित्या या जागतिक संकटाला सामोरे जाऊ असा दिलासाही या घंटा-थाळी-टाळ्या वादनातून मिळाला. करोना विषाणूने जगभरात जे मृत्यूतांडव सुरू केले आहे त्याने भयभीत झालेल्या मनांना दोन क्षण विसावाही मिळाला. जनतेकडून मोदींच्या आवाहनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मोदी-विरोधकांची तोंडे कडवट झाली नसती तरच नवल. त्यामुळेच त्यांच्यापैकी काहींना यातून थेट ध्वनिप्रदूषणाचा त्रास झाला, तर काहींनी मोदींवर सणासारखी स्थिती निर्माण केल्याची टीका केली. वास्तवत: मोदीजींनी, करोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त रुग्णांवर न थकता अहोरात्र उपचार करणार्या डॉक्टर, परिचारिका व रुग्णालयांतील अन्य कर्मचार्यांचे आभार मानण्यासाठी आपापल्या घरातून, दारांतून, खिडकीत उभे राहून टाळ्यांचा नाद करा, असे सुस्पष्ट आवाहन केले होते. या वैद्यकीय व्यावसायिकांकडून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता केल्या जाणार्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आवाहन होते. त्याला एक विशिष्ट अशी करोनासंबंधित पार्श्वभूमीदेखील होती. स्पेनमधील नागरिकांनी आपापल्या घरांच्या सज्ज्यात उभे राहून अशाच तर्हेने आभारप्रदर्शन केल्याची दृश्ये आपल्याकडील लोकांनी पाहिलेली होती. अशा आगळ्या तर्हेने कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनुभव निश्चितपणे या संकट काळात देशातील जनतेचे मनोबल उंचावून गेला आहे. आणि जगभरातील कोरोनासंबंधी परिस्थिती पाहता मनोधैर्य उंचावलेले राहणे तितकेच आवश्यक आहे. इटलीसारख्या देशातील परिस्थिती जिवाचा थरकाप उडवणारी आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. सामाजिक संपर्कातून होणार्या कोरोनाच्या फैलावाचा टप्पा आपण अजून गाठलेला नाही. आजवरच्या केेसेस या थेट ज्ञात वैयक्तिक संपर्कातून संसर्ग झाल्याच्या आहेत. त्यामुळेच इथून पुढचे काही दिवस जनतेने विशेष काळजी घेण्याची नितांत गरज आहे. आणि त्यामुळेच मोदीजींनी पुन्हा एकदा जनतेला सरकारी आदेशांचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याकडची अफाट लोकसंख्या व आरोग्ययंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेता इटलीसारखी परिस्थिती निर्माण होऊ देणे आपल्याला कदापि परवडणारे नाही. त्यामुळे सरकारी पातळीवरून पदोपदी सांगितले गेल्याप्रमाणे 31 तारखेपर्यंत प्रत्येकाने शक्यतो घरातच थांबून स्वत:ची सुयोग्य काळजी घ्यायला हवी आहे.