Breaking News

चांगली पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची -ना. दीपक केसरकर

पनवेलमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारार्थ स्नेहमेळावा

पनवेल : प्रतिनिधी
जगाचे नेतृत्व करायचे असेल तर चांगली पिढी घडविणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. 25) रोजी पनवेल येथे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मेळाव्यात केले.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी पनवेलमधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात मुख्याध्यापक व शिक्षक मेळावा आयोजित केला होता. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार भगवान साळुंखे, गीता पालरेचा, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, रामदास शेवाळे, अ‍ॅड. सोमण, जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, शिक्षण हे पवित्र कार्य आहे. भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. शिक्षकांचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही 61 हजार शिक्षकांना अनुदानित करण्याचा निर्णय विधिमंडळात घेतला. शिक्षण क्षेत्रात क्रांती करायची असल्याने शिक्षकांना कोणतीही इतर कामे दिली जाणार नाहीत. दैनिकाच्या चित्रकला स्पर्धेत लाखो मुले भाग घेतात, ही ताकद शिक्षकांचीच असल्याचेही त्यांनी सांगितले. तंत्रशिक्षण मराठीतून दिले जाणार आहेच, पण त्याच वेळी त्या विद्यार्थ्याला इतर भाषांचेही शिक्षण दिले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल करायचे आहेत. त्यासाठी शिक्षकांचा चांगला प्रतिनिधी वरिष्ठ सभागृहात असणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक असल्याने त्यांना शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रश्न माहित आहेत.म्हणून त्यांना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी, आपण मागील निवडणुकीत चूक केली, आता ती सुधारायची आहे, असे सांगून आपण आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. ज्यांना आपल्या संस्थेतील शिक्षकांना न्याय देता आला नाही, त्यांना मत देण्याची चूक करू नका. मला विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावायचे आहेत. त्यांना व्यावहारिक ज्ञान द्यायचे आहे. अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करायचे आहे. माझा निधी शैक्षणिक कामासाठीच खर्च करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. शिक्षक परिषदेचे माजी आमदार भगवान साळुंखे, आमदार महेंद्र थोरवे व गीता पालरेचा यांनीही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

2017च्या निवडणुकीत 2,840 मते बाद झाली ही खेदाची बाब आहे. मत बाद होऊ नये यासाठी मतदानाला येताना कसे यावे, मतदान कसे करावे, मत पत्रिकेची घडी कशी घालावी याचा आधीच शिक्षकांनी सराव करावा. आपला आमदार बनवायचा असेल तर चूक होऊ नये, याची काळजी घ्यावी.
-रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कामाचा आढावा ऐकून स्फूर्ती मिळाली आहे. त्यांना 21 संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिक्षकांनी मनातले संभ्रम बाजूला ठेवून मतदानाला जायला हवे. मी रयत शिक्षण संस्थेत काम करतो. त्यामुळे अनेकांना संभ्रम वाटतो, पण ‘रयत’मध्ये मतदानाचे स्वातंत्र्य आहे. शरद पवारांचे कोणतेही बंधन नाही. भाजपच्याच मंत्र्यांनी रयतची जास्त कामे केली आहेत. मंत्री रवींद्र चव्हाणांनी योग्य माणूस दिला आहे. त्यामुळे भीती न बाळगता मतदान करा.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

कोकण शिक्षक मतदारसंघातून 2017पर्यंत शिक्षकांचा प्रतिनिधीच आमदार होता. त्यानंतर आलेल्या प्रतिनिधीने शिक्षकांचे प्रश्न सोडवले नाहीत. आता पुन्हा ती घोडचूक करू नका. शिक्षक प्रतिनिधी पाहिजे हा आग्रह धरा. पनवेल तालुक्यातून 60 टक्केपेक्षा जास्त मते ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळतील, असा विश्वास मला आहे.
– आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply