Breaking News

…तर दोष कुणाचा?

लॉकडाऊनमुळे जनतेवर येऊ घातलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन अनेक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. बँकांनी गृह तसेच अन्य कर्जांचे हप्ते किमान तीन महिने घेऊ नयेत, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने नुकतेच केले होते. या आवाहनाला अनुसरून आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आदी चार बँकांनी हे हप्ते घेणार नसल्याची घोषणा केली आहे. विजेचे दर कमी करण्याचे पाऊलही उचलण्यात आले आहे. शाळांनी पालकांकडे फीसाठी तगादा लावू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोरोना फैलावाचा तिसरा टप्पा देशाने अद्याप गाठलेला नाही. महाराष्ट्रातली स्थिती बर्‍यापैकी नियंत्रणाखाली अशा आशादायी बातम्यांनी सोमवारी लक्ष वेधून घेतले होते. हा आनंद अल्पजीवी ठरू नये असाही विचार लगेचच मनात डोकावला होता, पण ही भीती खरी ठरली की काय असे वाटावे अशा तर्‍हेचे तपशील मंगळवारी संध्याकाळपर्यंत उघड झाले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी सकाळी 225 इतकी होती, ती संध्याकाळपर्यंत थेट 302वर गेली. यात एकट्या मुंबईतील 59 कोरोना रुग्णांची भर पडली होती. राज्यातील ही स्थिती तर अवघ्या देशभरातील लोकांच्या काळजाचा ठोका दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील कोरोना फैलावाच्या बातम्यांनी चुकवला. निजामुद्दीन परिसरात 1 ते 15 मार्चदरम्यान टप्प्याटप्प्याने आयोजित धार्मिक कार्यक्रमात दोन हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा निरनिराळ्या राज्यांतील कोरोना बाधितांशी असलेला संबंध काळजात धस्स करणारा आहे. कार्यक्रमातील अनेक धर्मोपदेशक हे मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया या देशांतून आले होते. या तपशिलांनी दिल्लीच नव्हे, तर अवघा देश हादरला आहे. तबलिगी जमातच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये, तर आणखी तिघांचा तामिळनाडू, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर या राज्यांत मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले एकाच इमारतीतील 24 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे, तर कार्यक्रमात भाग घेतलेले 109 जण महाराष्ट्रात परतल्याची माहितीही यंत्रणेच्या हाती आली आहे. सगळ्याच राज्यांना आता या मंडळींचा परतल्यावर वा येताना वाटेत किती लोकांशी संपर्क आला याचे तपशील मिळवावे लागत आहेत. नियमानुसार कोणतीही परवानगी न घेता इतका मोठा समुदाय जमा करणारा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल निजामुद्दीनच्या मरकजच्या मौलानाविरोधात दिल्ली सरकारने गुन्हा दाखल केला आहे. यापैकी अनेक लोक दिल्लीहून अन्य राज्यांत जाऊन आपापल्या राज्यांत परतले आहेत. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 700 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर 335 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या एका कार्यक्रमामुळे देशभरात कोरोनाचा वेगाने फैलाव होईल की काय या विचाराने देशभरातील सरकारी यंत्रणांची झोप उडाली आहे. आता या अवघ्या अक्षम्य बेजबाबदारपणाबद्दल कुणाला दोष द्यायचा आणि त्यातून साध्य तरी काय होणार? केंद्रातील, राज्यांतील, स्थानिक पातळीवरील सरकारी यंत्रणा अहोरात्र कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी झटत आहेत. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्धची ही लढाई आघाडीवर राहून लढत आहेत. सरकारी पातळीवरून प्रयत्नांची शर्थ सुरू असताना जनतेनेही आपल्या जबाबदारीचा विचार अवश्य करायला हवा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास दोष कुणाचा म्हणणार?

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply