कर्जत : बातमीदार
थेट सरपंचपदासाठी एक आणि सदस्य पदाच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. जानेवारी 2020मध्ये पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 13 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र स्वतंत्रसैनिक वि. रा. देशमुख यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजित खैरे काम पाहत असून त्यांच्याकडे निर्धारित वेळेत तीन प्रभागात सात जागांसाठी सात अर्ज प्राप्त झाले होते. तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या थेट सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी (दि. 28) दाखल अर्जांची छाननी झाली असून सर्व अर्ज वैद्य ठरले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी एकमेव अर्ज दाखल झाले असल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली.स्थानिक ग्रामविकास आघाडीच्या संजना बाळू पवार या थेट सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत.तर प्रभाग एक मधील तीन जागांवर शिवाजी कुंभार, सुनील देशमुख आणि सारिका वाघमारे, प्रभाग दोनमधील दोन जागांवर निर्मला देशमुख आणि हिराबाई जाधव तर प्रभाग तीनमधील दोन जागांवर तुकाराम भोईर आणि राम वाघमारे हे बिनविरोध निवडले गेले आहेत. स्वतंत्रसैनिक वि. रा. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ विलास देशमुख, विजय देशमुख, शिवाजी देशमुख, सोपान देशमुख, नामदेव कुंभार, सुनील कुंभार, बंडू पाटील, रमेश भोईर, प्रवीण देशमुख, किशोर दळवी, विवेक देशमुख, समीर दळवी यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले.