Breaking News

फुकाचा गदारोळ

भिडे गुरुजी यांची चूक असेल तर कारवाई होईलच याच शंका नाही, परंतु त्यांना ‘गुरुजी’ असे संबोधू नये हा विरोधकांचा आग्रह मात्र अजब आहे. कुठल्याही महापुरूषाविषयी निंदाजनक वक्तव्य करणे आक्षेपार्हच आहे व यापुढेही राहील असा निर्वाळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहातच बुधवारी दिला आहे.

अमरावतीमधील भाषणात महात्मा गांधी यांच्याबाबत बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरूजी यांनी वादग्रस्त विधान केले असा गदारोळ सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. यापूर्वीही भिडे गुरूजींनी केलेल्या वक्तव्यांविषयी वेळोवेळी वाद निर्माण झाला आहे. ही वक्तव्ये कुणाला पटतील किंवा कुणाला आवडणार नाहीत. लोकशाहीमध्ये अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. भिडे गुरूजींनी केलेल्या कुठल्याही कथित वक्तव्याचे समर्थन करण्याचे काहीच कारण नाही. तशी विधाने त्यांनी केली असतील तर ती वैयक्तिक समजायला हवीत. त्याचा भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीशी संबंध जोडणे हास्यास्पद आहे. राज्य सरकारचा तर त्याच्याशी दुरान्वयानेदेखील संबंध नाही. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या मुद्यावरून बुधवारी विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. यासंदर्भात निवेदन करताना फडणवीस यांनी भिडे यांच्या नावापुढे ‘गुरुजी’ अशी उपाधी लावली तर त्यासही काँग्रेस आमदारांनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्याविषयी बोलताना, संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडतात. त्यांचे हे कार्य चांगलेच आहे, पण तरीही महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा अधिकार त्यांना कोणीही दिलेला नाही. कोणालाही असा अधिकार नाही. महापुरूषांबाबत अवमानजनक वक्तव्य कुणीही केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे ठाम प्रतिपादन फडणवीस यांनी केले. भिडे हे आम्हाला गुरुजी वाटतात, त्यात कुणाला काय अडचण आहे असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. वास्तवत: काँग्रेस, उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तिन्ही विरोधी पक्षांची अवस्था सध्या भरकटल्यासारखी झाली आहे. भिडे गुरुजींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी ते आटापिटा करत आहेत, परंतु स्वत:ला एक न्याय आणि विरोधकाला दुसरा हे काही निरोगी लोकशाही व्यवस्थेचे लक्षण नाही. यापूर्वी ‘शिदोरी’ या काँग्रेसच्या मुखपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची यथेच्छ नालस्ती करण्यात आली होती. त्यांना ‘माफीवीर’ असे संबोधण्यात आले होते. स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचा आपण अपमान करत आहोत याचे भान काँग्रेसी नेत्यांना तेव्हाही नव्हते आणि आताही नाही. देशातील महापुरूषांबाबत आपल्या नेत्यांनी आजवर काय-काय मुक्ताफळे उधळली आहेत हे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी तपासून पहावे. भिडे गुरूजी यांनी अमरावती येथील भाषणात महात्मा गांधी यांची बदनामी केली असा आरोप हे नेते करतात, परंतु ते भाषण अमरावती येथे झालेलेच नाही. ते कुठल्या तरी अन्य ठिकाणचे आहे असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुळात कथित वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरूजींचेच आहे का हे आधी तपासावे लागेल. त्यासाठी आवाजाचे नमुने तपासले जात असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. बहुजनांना शिवरायांचा इतिहास समजावण्यासाठी कार्यकर्ता म्हणून भिडे गुरूजींनी अहोरात्र काम केले आहे. छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना पूजास्थान मानून त्यांची निगराणी करण्यासाठी युवापिढीला प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घ्यायला हवी की नको?

Check Also

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Leave a Reply