पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणार्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पेणच्या तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही जण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून चढ्या भावाने कालांतराने विक्री करण्याच्या मानसिकतेत असल्याचा संशय आहे. हा प्रकार निदर्शनास आल्याने तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित व्यापारी, साठेबाजांची गोडाऊन सील करण्यात येणार आहेत. कुणीही मला पुराव्यानिशी माहिती दिली तर संबंधिताचे नाव गुप्त ठेवून साठेबाजीला तत्काळ लगाम घालण्यात आमची यंत्रणा सक्षम आहे, असेही त्या म्हणाल्या.
ज्या दुकानदारांच्या दुकानातील माल संपत आला असेल त्यांनी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून माल आणून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करावयाच्या आहेत. या संबंधित जीवनावश्यक वस्तू वाहतूक करण्याच्या सूचनाही संबंधित दुकानदारांना देण्यात आल्या असून पासेसही देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता या संकटाचा मुकाबला एकजुटीने व संयम ठेवून करायचा आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये याकरिता शासन प्रयत्नशील आहे. फक्त जनतेच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी केले आहे.