दिल्लीमध्ये जमावबंदी असताना निजामुद्दीनमधील मरकजमध्ये अनेक जण एकत्र राहिले, झोपले. देशात तोवर कोरोनाबाधितांच्या केसेस उघड झाल्या होत्या. अमेरिका, इटलीसारख्या देशांमधून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत होते. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणा हे पाहून हबकल्या होत्या. तरीही मरकजमधील लोकांपर्यंत परिस्थितीचे गांभीर्य पोहोचलेच नाही. हे कसे? तरी निव्वळ त्यांनाच दोष द्यायचा? भाजीखरेदीसाठी गर्दी करणार्यांना, अकारण हिंडणार्यांना तरी ते कुठे कळले आहे?
देशातील कोरोना फैलावासंबंधी परिस्थितीने गेल्या दोनएक दिवसांत काहिसे गंभीर वळण घेतले आहे. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले अनेक जण तिथून देशातील विविध राज्यांत परतले हे एव्हाना जगजाहीर झाले आहे. यापैकी काहींना कोरोनाची लागण झाल्याने धोक्याची शक्यता वाढली आहे, पण धोका वाढण्याचे तेवढेच एक कारण नाही. आजही देशाच्या अनेक भागांत लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. याला शहरी-ग्रामीण कुठलाच भाग अपवाद नाही. एकीकडे देशातील 75 टक्के जनतेने लॉकडाऊनच्या आवाहनाला चांगले सहकार्य केल्यामुळे 14 एप्रिलच्या पुढे लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता नाही, अशी ग्वाही केंद्र सरकारकडून दिली जात आहे, तर दुसरीकडे उरलेल्या 25 टक्के लोकांना बाहेर पडण्यापासून कसे आवरावे हे ठिकठिकाणच्या स्थानिक यंत्रणांना कळेनासे झाले आहे. भाजीखरेदी, वैद्यकीय गरज अशी कारणे देऊन लोक बाहेर पडत आहेत. पोटापाण्याची सोय करण्यासाठी भाजीपाला लागणारच. तुटपुंजी कमाई असलेले लोक घाऊक खरेदीतून साठा करू शकत नाहीत. दिवसभरापुरते जेमतेम आणायचे याचीच सवय त्यांना जडलेली. मोठी खरेदी करणे परवडतही नसावे, परंतु गरज खरी आहे म्हटले तरी धोका टळत नाही. या लोकांना गर्दी न करता भाजीपाला खरेदी करता यावा यासाठी योजना आखण्याची गरज आहे. कदाचित छोट्या-छोट्या भागांसाठी वेळा ठरवून द्याव्या लागतील व त्या वेळेत बाहेर पडणार्यांनाही परस्परांमध्ये मीटर-दीड मीटरचे अंतर ठेवून खरेदी करणे का आवश्यक आहे ते समजावून द्यावे लागेल. सोशल डिस्टन्सिंगची गरज का आहे? लोकांनी संपर्क का टाळला पाहिजे? एकाकडून दुसर्याकडे आणि दुसर्याकडून आणखी दहा जणांकडे असा झपाट्याने आकडा कसा वाढू शकतो हेच काही लोकांना अद्याप नीटसे कळलेले दिसत नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशात एका दिवसात 850 माणसांचा बळी जातो. मग समूह संसर्गाचा टप्पा गाठला गेल्यास भारतासारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाला आवर घालणे उपलब्ध वैद्यकीय साधनसामग्रीमध्ये शक्य होईल का? सरकारी यंत्रणांनी हे सारे परोपरीने समजावून सांगूनदेखील अनेकांना अद्यापही ते कळलेले नाही. मंगळवारी देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 386ने वाढून 1637वर पोहोचली, तर आजवर 38 जणांचा या साथीमुळे बळी गेला आहे. एकीकडे वाढता धोका लक्षात घेऊन सरकारी यंत्रणा विशिष्ट भागांमधील बंदोबस्त कठोर करीत चालली आहे. जीवाची पर्वा न करता थेट कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्यांनी किती दिवस असेच न थकता लढत राहायचे? घरी बसणे एवढेच सहकार्य आपल्याला करायचे आहे हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. गर्दी टाळली तरच सोशल डिस्टन्सिंग प्रत्यक्षात आणणे शक्य होऊ शकेल आणि अखेर एकदाचा कोरोनाचा अटकाव दृष्टिपथात येऊ शकेल.