दिल्लीतील 141 नव्या रुग्णांपैकी 129 जण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमााला उपस्थित होते. गर्दीतून किती मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव होऊ शकतो हेच या उदाहरणातून ठळकपणे अधोरेखित होते. तबलिगी
जमातचा हा कार्यक्रम तसेच स्थलांतरित मजुरांनी दिल्लीत केलेली गर्दी
यामुळे सरकारच्या कोरोनाला अटकाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा
निर्माण झाल्याची खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही शुक्रवारी व्यक्त केली.
कोरोना विषाणूच्या फैलावाशी अवघ्या जगाची झुंज सुरूच आहे. भारतात रोज नव्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे म्हणायला वाव आहे. याचे अवघे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ज्या तत्परतेने व विचारपूर्वक पावले उचलली त्याला जाते. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसत आहे. नव्याने उघडकीस आलेल्या केसेसपैकी 65 टक्के केसेस या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांच्या आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एव्हाना 2301 वर गेलेली दिसून येत आहे. यात दिल्लीतील 141, महाराष्ट्रातील 88 आणि तामिळनाडूतील 75 नव्या रुग्णांचा समावेश आहे. सरकारी पातळीवरून सातत्याने आवाहन करूनही अद्यापही भाजी घेण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातही ठिकठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहेत. पोलीस लोकांना बाहेर पडण्यापासून परावृत्त करण्याच्या कामी जुंपलेले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी निम्मे रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. जिथे-जिथे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्या-त्या भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरातील अशा भागांची संख्या एव्हाना 200च्या वर गेली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत मुंबईतील सर्वाधिक दाटीवाटीच्या धारावी परिसरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेची चिंता वाढली आहे. यापैकी एक जण 35 वर्षीय डॉक्टर असल्याने त्याचा अनेकांशी संपर्क झाला असण्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू आहे. नवी मुंबईतील खारघर येथे केंद्रीय सुरक्षा बल अर्थात सीआरपीएफचे आणखी सहा जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीअंती समोर आले आहे. येथील सीआरपीएफच्या पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे यापूर्वीच समजले होते. कोरोनाचा देशातील फैलाव अमेरिका, इटलीच्या तुलनेत नियंत्रणाखाली असला तरी अद्याप आकडे रोजच्या रोज वाढतच आहेत. एकीकडे मोठ्या संख्येने लोक लॉकडाऊनमुळे घरी थांबलेले असले तरी पोलिसांशी वा वैद्यकीय कर्मचार्यांशी जमावाने संघर्ष केल्याच्या बातम्याही देशाच्या निरनिराळ्या भागांतून आल्या आहेत. अशा तर्हेचे वर्तन या यंत्रणांचे मनोबल खच्ची करू शकते व त्यामुळेच त्यावर लगेच सुयोग्य कारवाई व्हायलाच हवी. सर्व पंथीय, सर्व विचारधारांच्या लोकांनी लॉकडाऊनच्या प्रयत्नांना पूर्ण साथ देण्याची गरज आहे, असे मोदींनी म्हटले होते. कोरोनाच्या या जागतिक संकटकाळात कुठल्याही तर्हेची सामाजिक तेढ कुणालाच परवडणार नाही याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. महायुद्धापेक्षाही भयानक अशा या लढाईत संपूर्ण देशाने एक होऊन सहभागी होणे आवश्यक आहे. कोरोनाविरोधातील लढाईत मनाला उभारी देण्यासाठी, आपल्यापैकी कुणीही एकटे नाही ही भावना रुजवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी अंधार करून दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. या छोट्याशा कृतीतून निर्माण होणारी सकारात्मकतेची व एकीची भावना सगळ्यांच्याच मनाला उभारी देईल हे निश्चित.