पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी मला आपल्या सर्वांची नऊ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ नऊ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा
आणि आपली सामुदायिक शक्ती दाखवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओ संदेशात सांगितले की, येत्या रविवारी आपल्याला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी 5 एप्रिलला 130 कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. या रात्री 9 वाजता मला आपली फक्त नऊ मिनिटे हवी आहेत. या वेळी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा.
देशभर सर्व लोक जेव्हा एक एक दिवे उजळतील तेव्हा प्रकाशाच्या महाशक्तीची जाणीव होईल. यामुळे आम्ही एकाच उद्देशाने एक होऊन लढत आहोत अशी भावना मनात जागृत होईल, असे सांगताना हे दिवे जाळताना आम्ही एकटे नाही आहोत असा संकल्प करू या, असे मोदी म्हणाले.
वेळोवेळी देशातील जनतेच्या सामूहिक शक्तीची भव्यता, दिव्यता आणि त्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. देश कोरोनाविरुद्ध इतकी मोठी लढाई लढत असताना आम्हाला जनता जनार्दनाचे विराट रूप, त्यांची अपार शक्ती याचा सतत साक्षात्कार करीत राहिले पाहिजे, असेही मोदी पुढे म्हणाले. 5 एप्रिलला रात्री 9 वाजता या नऊ मिनिटांच्या काळात कोणालाही बाहेर जायचे नाही. कोणालाही एकत्र जमायचे नाही, हे मोदी यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
‘छोट्या पवारां’कडून स्वागत
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत सामुदायिक शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी दिवे व मेणबत्ती पेटविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. ’दिव्यांच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा. तसे असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. अशाच प्रकारे प्रत्येकाने स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवून एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करावा,’ असे रोहित यांनी ट्विट करून नमूद केले आहे. आहे.