पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका मालकीच्या इमारती, नाट्यगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र व शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. 7) झालेल्या पालिका महासभेत घेण्यात आला. त्यामुळे दरमहा होणारा वीजभाराचा तिजोरीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेला केंद्र शासनामार्फत फाईव्ह स्टार मानांकन मिळण्यासाठीचा प्रस्ताव देण्यास या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे विजेच्या स्वयंपूर्णतेसह स्वच्छ पनवेलच्या दिशेने महापालिकेने पहिले पाऊल उचलले असे म्हणावे लागेल. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे ऑनलाईन पद्धतीने महासभा घेण्यात आली. या वेळी आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेला केंद्र शासनामार्फत फाईव्ह स्टार मानांकन मिळण्यासाठीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असते. त्याला आजच्या महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका मालकीच्या अग्निशमन इमारत, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र व स्व. विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी सौरऊर्जा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे दरमहा होणारा वीजभाराचा तिजोरीवरील ताण कमी होणार असून या महत्त्वपूर्ण विषयाला आज सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. पनवेल शहर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्तीचा टप्पा जऊऋ++ घोषित करणे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या पनवेल महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाकरिता सुधारित मंजूर प्रकल्प अहवालातील वाढीव घंटागाड्या खरेदी करण्याच्या विषयास महासभेमध्ये मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील वळवली, भिंगारी व मुरबी (खारघर) या ठिकाणी शाळा बांधकाम करणे, कोयनावेळे येथे समाज मंदिर बांधणे, कळंबोली येथील श्री काळभैरव मंदिरासमोरील सभागृहाचे वाढीव काम करणे, तसेच पनवेल, कळंबोली व खारघर येथील एकूण 14 उद्यानांच्या दोन वर्षाकरिता संगोपन करण्याच्या विषयास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. महापालिका हद्दीतील पनवेल शहरातील पटेल मोहल्ला व लगतच्या परिसरातील जुन्या भूमिगत मलनिस्सारण वाहिन्यांच्या जागी नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, तसेच धाकटा खांदा, बेलपाडा, नावडे, नौपाडा, मोठा खांदा आणि कामोठे या सहा गावांना पायाभूत सुविधा पुरवण्यास महासभेने मंजुरी दिली. पनवेल महानगरपालिकेचे स्वतःचे माता व बाल संगोपन केंद्र, हॉस्पिटल उभारण्याबाबत व व्यवहार्यता पडताळणी अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर करून त्याचे प्रेझेंटेशन या वेळी सर्वसाधारण सभेपुढे देण्यात आल्यावर तो अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी इंदौर येथे प्रशिक्षण व अभ्यास दौरा आयोजन करण्याबाबतच्या निर्णयास महासभेने मंजुरी दिली.