Breaking News

कोरोनाविरुद्धचा लढा

जगभरात विशेषत: युरोपात तसेच महासत्ता अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण व मृतांचा आकडा मोठा नाही. सरकारने वेळीच उचललेल्या ठोस पावलांमुळे आपण 130 कोटी नागरिक सुरक्षित आहोत, मात्र धोका अजूनही टळलेला नाही.

सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोनाची. या महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. एखादा दहशतवादी हल्ला, नव्हे तर जागतिक युद्धाचीही एवढी झळ विश्वाला बसली नव्हती की नैसर्गिक आपत्तीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि मानवी जीवनात एकूणच वाताहत झाली नव्हती. 2020 हे वर्ष मोठे संकट घेऊन आले आहे. या संकटाची चाहूल लागूनही अनेक देश स्वस्थ बसले. ज्याची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. विकसनशील देशांमध्ये मोडणारे युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स यांसारखे देश संसर्गजन्य कोरोनामुळे पुरते कोलमडून पडले आहेत. सर्व जगावर राज करणारी अमेरिकाही हतबल झाल्याचे दिसून येते. या देशांमध्ये माणसे अक्षरश: किड्या मुंग्यांप्रमाणे मरत आहेत. बेफिकीरपणा, अतिआत्मविश्वास त्यांना नडला. परिणामी पश्चाताप करण्यावाचून त्यांच्याकडे अन्य पर्याय उरलेला नाही. त्या तुलनेत आपल्या देशात अद्याप तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृष्टीने ठोस व कठोर निर्णय घेतल्याने आपला देश सुरक्षित आहे. आपल्याकडे कोरोनाची लागण झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण जास्त नाहीए. अर्थात, हळुहळू आकडा वाढतोय. त्यामुळे निर्धास्त राहता येणार नाही. पंतप्रधान मोदी ते जाणून आहेत. म्हणूनच त्यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलेला आहे. कोरोनाची साखळी तोडणे हा त्यामागचा उद्देश आहे. लॉकडाऊन, संचारबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे गणित बिघडले आहे. काही प्रमाणात नोकरवर्ग ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असला तरी घरी असलेल्या अनेक कामगारांना यापुढे उदरनिर्वाह कसा करायचा याची भ्रांत आहे. कारण जी काही पुंजी त्यांनी जमा केलेली होती ती एव्हाना संपत आलेली आहे. हाती काही नसल्याने मध्यमवर्गीय लोक धास्तावले आहेत. उद्योजक, धंदेवाईकांचेही व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजंदारीवर असणार्‍यांचे सर्वांत जास्त हाल होत आहेत. बाहेर पडता येत नाही आणि घरात बसून पोटाची आग शांत करता येत नाही अशा दुहेरी कात्रीत ते अडकले आहेत. एकूणच बहुतांश जणांना जगण्याची चिंता सतावत आहे. सुदैवाने मदतीचे असंख्य हात या अरिष्टात सरसावल्याचे पहावयास मिळते. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आदी मंडळी गोरगरीब, गरजूंना मदत करीत आहेत. कुणी जीवनावश्यक वस्तू पुरवतोय, कुणी अन्नदान करतोय, तर कुणी मास्क, सॅनिटायझर वाटप करतोय. अशा परिस्थितीत सकारात्मक बाब म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढाईत काही अपवाद वगळता सारा देश गंभीर आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणाही आपले काम कर्तव्यनिष्ठेने बजावत आहेत. आपल्याकडे याआधीही अनेक संकटे आली आहेत आणि त्या संकटांचा देशवासीयांनी एकजुटीने मुकाबला केल्याचा इतिहास आहे. कोरोनाविरुद्धची अर्धी लढाई तर आपण जिंकलेलीच आहे. आता उर्वरित लढाईही आपणनक्की जिंकू. फक्त त्यासाठी आणखी थोडा वेळ धीर धरणे जरुरीचे आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply