मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी रात्री 9 वाजता नऊ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल फ्लॅशलाइट्स सुरू करावे, या आवाहनाला देशवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्सही सुरू करून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सारा देश एकत्र असल्याचे दाखवून दिले.
अनेक ठिकाणी लोकांनी यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. दुकानांत दिवाळीच्या पणत्या विकायला आल्या होत्या. रात्री 9 वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
कोरोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता तुमची नऊ मिनिटे हवी आहेत, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्याला समस्त जनतेने उचलून धरत प्रकाशपर्व साजरे केले.
या वेळी आबालवृद्धांनी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरणात वेगळाच उत्साह पाहावयास मिळाला.
नवीन पनवेल : पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी कुटुंबीयांसमवेत दिवे पेटवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.