महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. कोरोनाच्या संकटातून देशातील जनतेची सुखरूप सुटका करायची असेल, तर लॉकडाऊन वाढवावेच लागेल, असे मत अनेक वैद्यकीय
तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.
एकीकडे अमेरिका-इटलीच्या तुलनेत आपल्याकडचे कोरोनासंबंधित आकडे बरेच लहान दिसत असल्याने असंख्य भारतीयांना हायसे वाटत असले तरी कोरोनाचा फैलाव उतरणीस लागला, असे म्हणण्यासारखी परिस्थिती दुर्दैवाने अद्याप तरी देशात नाही. देशातील लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येण्यास केवळ एक आठवडा उरलेला असताना कोरोनाबाधितांचे आकडे मात्र अद्यापही रोज वाढतच आहेत. अद्याप केंद्र सरकारने लॉकडाऊनसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी लॉकडाऊन वाढवण्याच्या दिशेने विचार सुरू असल्याचे सरकारी गोटातून आता सांगितले जाते. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाचा गंभीर स्वरूपाचा फैलाव झालेल्या भागांकरिता मास्टर प्लॅन मात्र तयार केला आहे. अशा भागांमध्ये सीमाबंदी कायम राखली जाणार असून तेथील हॉट स्पॉट सील केले जातील. अशा भागांमध्ये अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा हा सरकारी यंत्रणेकडून केला जाईल. अर्थात या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी केव्हा सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी सांगितले गेल्याप्रमाणे लॉकडाऊन मागे घेण्यासंदर्भात वा टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यासंदर्भात सुयोग्य वेळी निर्णय घेतला जाईल, परंतु सद्यस्थिती पाहता लॉकडाऊन लांबण्याचीच शक्यता अधिक असल्याचा सूर सरकारी गोटातून लागत आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये लॉकडाऊन लांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर जपानमध्ये पाच शहरांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. इकडे देशात मंगळवारी संध्याकाळपर्यंत 354 नवे कोरोना रुग्ण नोंदले गेले असून गेल्या 24 तासांत आणखी आठ जणांचा कोविड-19मुळे बळी गेला आहे. कोरोनामुळे दगावलेल्यांची देशातील संख्या त्यामुळे 117 वर पोहचली, तर आजवर 326 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोनाबाधितांचा आकडा 1018 वर पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 150 नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकीकडे महाराष्ट्रातल्या कोरोना टेस्ट्सची संख्या मोठी असली तरी देशातील इतर अनेक राज्यांमध्ये फारच कमी लोकांची कोरोनासंबंधी चाचणी पार पडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या चाचण्यांवरच भर दिलेला आहे. वेगाने जास्तीत जास्त संशयितांची कोरोनाची चाचणी पार पाडण्यासाठी महाराष्ट्राला रॅपिड टेस्टिंगची अनुमतीही केंद्राकडून मिळाली आहे. यात घशातील द्रावाऐवजी रक्ततपासणी करून शक्य तितक्या लवकर कोरोनाची बाधा आहे वा नाही हे निश्चित केले जाते. या रॅपिड टेस्टिंगमुळे रुग्ण लवकरात लवकर उपचारांपर्यंत पोहचत असल्यामुळे त्याच्या प्रकृतीत घसरण होणेही रोखता येते, तसेच फैलावासही अटकाव होतो. कोरोनाच्या अटकावासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून संरक्षण देणारी लस तयार केल्याचा दावाही नुकताच एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीने केला. तूर्तास या लसीची प्राण्यांवर चाचणी सुरू असून नंतर वैद्यकीय चाचणीसाठी ती पाठवली जाईल. सगळ्या प्रयत्नांना यश येऊन अखेर लवकरच मानव या जागतिक संकटातून स्वत:ची सुटका करून घेईल याविषयी शंका नाही. तूर्तास त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्याकडे लॉकडाऊन मात्र लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.