Breaking News

टिकाऊ रंगाची जपानी टेक्निक भारतात, अरहन टेक्नॉलॉजीसचा प्रयत्न, पर्यावरणपूरक रंग असल्याचा दावा

कर्जत : बातमीदार

जपानमध्ये 25 वर्षे कॉन्सल्टसी क्षेत्रात काम करणारे सुदेश रोकडे यांनी उष्ण वातावरणात आणि खार्‍या हवामानात तब्बल 15-20वर्षे तग धरू शकेल असा रंग बाजारात आणला आहे.जपानमध्ये उत्पादन होत असलेला हा रंग भारतात रोकडे यांनी अरहन टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक असलेल्या या रंगावर खार्‍या पाण्याचा परिणाम होत नाही तसेच हा रंग बाहेरच्या उष्ण वातावरणाला नियंत्रणात ठेवण्याचे काम करीत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान दौर्‍यात रोकडे यांनी या रंगाची माहिती दिली होती. त्यावेळी महाराष्ट्रात आपल्या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे सर्वाधिक उष्णता रोधक क्षमता असलेल्या आणि चिवटपणा कायम ठेवणार्‍या सन ब्लेस या रंगाबाबत रोकडे यांनी स्थापन केलेल्या अरहन टेक्नॉलॉजी याकडून जनजागृती केली जात आहे. कर्जत येथे कंपनीचे सल्लागार रोकडे, प्रशासकीय अधिकारी आप्पासाहेब मिसाळ यांनी या रंगाबाबत माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक दाखवले. पर्यावरण राखण्याचे काम करणारा हा सनब्लेस रंग सध्या जपानमध्ये तयार होत असला तरी भविष्यात त्याची कोल्हापूर किंवा सातारा येथे निर्मिती करण्याचा या कंपनीचा प्रयत्न राहणार आहे.

 समुद्र किनारी असलेल्या इमारतींचा रंग खार्‍या पाण्यामुळे लवकर खराब होतो, त्यावर सन ब्लेस परिणामकारक ठरू शकते, असे सिद्ध झाले आहे. या रंगामुळे  भिंतींना पापुद्रेदेखील पकडणार नाहीत. मोठ्या वेअर हाऊसच्या शेडमध्ये वातावरण एकसारखे राहण्यासाठी वातानुकूलित यंत्रे वापरली जातात, या रंगामुळे तेथे तापमान एकसारखे ठेवण्यास मदत होईल. घरे, इमारती आदी ठिकाणी या रंगामुळे तापमान कमी करण्यात आणि थंडीच्या दिवसात तापमान उष्ण ठेवण्यास मदत होणार आहे.

‘सन ब्लेस‘ हा रंग निर्मितीचा प्रकल्प सातारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात उभा करण्याचा अरहन टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रयत्न आहे. त्या भागात पायाभूत सुविधा आणि आवश्यक असलेला कच्चा माल कमी वेळेत उपलब्ध होऊ शकतो, असे सुदेश रोकडे यांनी यावेळी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply