Breaking News

नियमांच्या उल्लंघनामुळे नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. कोरोना आता गेला अशा संभ्रमात काही नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. परिणामी कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. प्रत्येक नोडमध्ये प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुक्त झालेल्या इंदिरानगर, चिंचपाडा परिसरामध्येही पुन्हा रुग्ण आढळू लागले आहेत. काही निष्काळजीपणा करणार्‍यांचा फटका सर्व शहरवासीयांना सहन करावा लागत असून नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास परिस्थिती अजून हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ व ‘शून्य मृत्यू मोहीम’ सुरू केली होती. जूनमध्ये सुरू झालेल्या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला व रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये एका महिन्यात 10,398 जणांना कोरोनाची लागण झाली होती. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण 8,115 वर आले. नोव्हेंबरमध्ये 3,805 व डिसेंबरमध्ये 2,758 तसेच जानेवारीमध्ये सर्वांत कमी 2,027 रुग्ण वाढले. फेब्रुवारीच्या 28 दिवसांमध्ये तब्बल 2,302 रुग्ण वाढले आहेत. मार्चच्या पहिल्या दिवसापासून प्रतिदिन 100 पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. पहिल्या तीन दिवसांत रुग्ण संख्या 554 झाली आहे. रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असून, महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येमध्येही वाढ करण्यात आली आहे. गत आठवड्यात सरासरी 2,415 जणांची चाचणी होत होती. बुधवारी 3,038 जणांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत शहरातील आठ लाख 84 हजार 109 जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी पाच लाख 81 हजार 675 जणांची आरटीपीसीआर व तीन लाख दोन हजार 434 जणांची अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत सहा लाख 74 हजार 720 जणांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. सद्य:स्थितीमध्ये 29 हजार 784 जणांचे क्वारंटाइन सुरू आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोरोनामुक्त झाला होता. या परिसरातही पुन्हा प्रादुर्भाव सुरू झाला असून तेथे पाच सक्रिय रुग्ण आहेत.

पालिकेचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही नियमित मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन नवी मुंबई  पालिका प्रशासनाने केले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply