Breaking News

श्वसनमार्गाचे आजार

आपल्या कुटुंबातील लहान बाळ म्हणजे एक आनंदाचा व चैतन्याचा झरा असतो. साहजिकच असे बाळ आजारी झाले की त्याचा सर्व कुटुंबावर परिणाम होतो. त्यात बाळ वारंवार आजारी होऊ लागले की आईवडिलांच्या चिंतेला पारावर उरत नाही. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जंतुसंसर्ग, विषाणूसंसर्ग लवकर होतो. त्यांच्या श्वसनमार्गाचा आकार लहान असल्याने जंतुसंसर्ग कमी वेळात व तीव्र स्वरूपात दिसून येतात. अनेक वेळा घरातील किंवा आजूबाजूच्या संपर्कातील आजारी व्यक्तींमुळे वारंवार सर्दी, खोकला होऊ शकतो. घराची अस्वच्छता, खेळत्या हवेचा अभाव, घरातील आणि घराबाहेरील धूर, धूळ प्रदूषण, घरातील पाळीव प्राण्यांचा संपर्क या बाबीदेखील कारणीभूत आहेत. पाळणाघरात, प्ले ग्रुपमध्ये जाणार्‍या बाळांमध्ये एकमेकांकडून जंतुसंसर्ग होऊन वारंवार सर्दी, खोकला होतो. कुपोषित बालकांमध्ये गोवर, डांग्या, खोकला, क्षयरोग अशा घातक आजारांमुळे वारंवार खोकला येऊ शकतो.

अगदी लहान म्हणजे 15-20 दिवसांच्या बाळामध्ये शिंकणे, नाक बंद आहे असे वाटणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. बाळ दूध चांगले पित असेल, श्वसनाचा काही त्रास नसेल व व्यवस्थित झोपत असेल तर कोणत्याच उपचाराची गरज नाही. नाक बंद राहिल्यास सलाइन ड्रॉप्सचा वापर करू शकता. पाच-सहा महिन्यांच्या बाळांमध्ये किरकोळ सर्दी, खोकला व बारीक धाप लागत असेल तर त्याला ब्रोक्रोलिट्स आजार असू शकतो. हा विषाणूंच्या संसर्गाने होतो. श्वसनाला त्रास होत असेल आणि बाळाला दूध पिता येत नसेल, तर अशा बाळाला त्वरित उपचार करणे गरजेचे असते.

एक ते दीड वर्षांचे बाळ सर्दी, किरकोळ खोकला, ताप यामुळे आजारी होऊन कानदुखीची तक्रार करीत असेल, तर त्याच्या कानाच्या पडद्याला सूज आलेली असू शकते. त्याला ‘ओटीस एडिआ’ असे म्हणतात. यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते, अन्यथा कानाचा पडदा फाटून गुंतागुंत होऊ शकते. साडेचार ते पाच वर्षांच्या बालकांमध्ये वारंवार होणारी सर्दी, खोकला, कायम तोंड उघडे ठेवून श्वास घेणे, रात्री खूप घोरणे, झोपेत श्वास अडकून दचकणे अशी सर्व लक्षणे अ‍ॅडेनॉईड ग्रंथीला सूज असल्याचे दर्शवितात. अ‍ॅडेनॉईड म्हणजे नाकाच्या आतमधील मागील बाजूला असलेल्या टॉन्सिलसारख्या ग्रंथी. या ग्रंथींना सूज आल्यास बरेच दुष्परिणाम होऊ शकतात.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply