Breaking News

मजुरांची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे प्रतिपादन

अलिबाग ः जिमाका

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनही सुरू आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी निराश्रित, मजूर, कामगारवर्गही अडकला आहे, मात्र त्यांची काळजी घेण्यास, त्यांच्यापैकी एकही मजूर उपाशी राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच येथे केले.

माणगाव तालुक्यातील एका मजूर कॅम्पला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, तहसीलदार प्रियंका आयरे- कांबळे उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मजूर कॅम्पची पाहणी करून मजुरांशी संवादही साधला. एकही मजूर उपाशी राहणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. मजुरांचे आवश्यक ते फॉर्म भरून त्यांची परिपूर्ण माहिती तयार करावी. कॅम्पमधील मजुरांची, त्यांच्या लहान मुलांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी. घरातील वृद्ध व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे व अन्य संबंधितांना दिल्या. हे सर्व करताना सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी स्वतःच्या स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. मास्क वापरावेत. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या सूचनाही काटेकोरपणे पाळाव्यात. कोरोनाविरुद्ध आपण सर्व एकजुटीने लढा देत आहोत आणि यापुढेही देणार आहोत, असेही त्या म्हणाल्या. या भेटीवेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मजूर कॅम्पमध्ये दिल्या जाणार्‍या सोयीसुविधांचीही पाहणी केली. मजुरांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि मजुरांनी घाबरू नये. प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेईल, असा विश्वासही  उपस्थित मजुरांना दिला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply